'सेक्रेड गेम्स'मधील बंटी मोठ्या पडद्यावर, 'या' चित्रपटात झळकणार
एबीपी माझा वेब टीम | 03 Apr 2019 12:06 AM (IST)
जतीन सरना हा यशपाल शर्मा यांच्या भूमिकेत दिसणार आहे. विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी करुन यशपाल शर्मा भारताच्या पहिल्या विजयाचे शिल्पकार झाले होते
मुंबई : नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स'मधील बंटीच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता जतीन सरना लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वातील विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघावर आधारित '83' चित्रपटात जतीन सरना दिसणार आहे. जतीन सरना हा यशपाल शर्मा यांच्या भूमिकेत दिसणार आहे. विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी करुन यशपाल शर्मा भारताच्या पहिल्या विजयाचे शिल्पकार झाले होते. 1983 मध्ये भारतासाठी पहिल्यांदा विश्वचषक उंचावणाऱ्या 'अजिंक्य' क्रिकेट टीमची कहाणी या स्पोर्ट्स ड्रामामध्ये पाहायला मिळणार आहे. 'या भूमिकेसाठी माझी निवड झाल्याचा आनंद आहे. प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या लार्जर दॅन लाईफ विषयावर चित्रपट निघत आहे, मला त्याचा भाग व्हायला मिळणं आनंददायी आहे. क्रिकेटविषयी माझ्या मनात प्रेम आहे.' अशी भावना जतीन सरनाने व्यक्त केली. '83' चित्रपटात कपिल देव यांची व्यक्तिरेखा रणवीर सिंग साकारत आहे. क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटीलच वडिलांची भूमिका साकारणार आहे. याशिवाय साकीब सलीम, साहिल खट्टर, ताहिर भसीन, पंजाबी गायक हॅरी संधूही या सिनेमात आहेत. 'एक था टायगर', टायगर जिंदा है यासारख्या सिनेमांचे दिग्दर्शक कबीर खान '83'चं दिग्दर्शन करणार आहेत.