#DeDePyaarDe Trailer : अर्ध्या वयाची गर्लफ्रेण्ड आणि घटस्फोटित पत्नीमध्ये अजयची रस्सीखेच
एबीपी माझा वेब टीम | 02 Apr 2019 09:04 PM (IST)
रकूल प्रीत सिंग या सिनेमात अजय देवगनच्या गर्लफ्रेण्डच्या भूमिकेत दिसेल, तर तब्बू त्याची घटस्फोटित पत्नी आहे. याशिवाय मीटू प्रकरणात अडकलेले ज्येष्ठ अभिनेते अलोकनाथही यामध्ये अजयच्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत.
मुंबई : अभिनेता अजय देवगनच्या 50 व्या वाढदिवशी 'दे दे प्यार दे' या त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. अर्ध्या वयाच्या तरुणीच्या प्रेमात पडलेल्या एका मध्यमवयीन घटस्फोटिताच्या भूमिकेत अजय देवगन दिसणार आहे. घटस्फोटाला 18 वर्ष झाल्यानंतर अजय 26 वर्षांच्या आयेशाच्या प्रेमात पडतो. त्यानंतर अचानक घटस्फोटित पत्नीच्या आगमनाने त्याच्या आयुष्यात काय खळबळ उडते, हे चित्रपटात पाहताना धमाल उडणार आहे. अजय देवगन आणि तब्बूची सुपरहिट जोडी यानिमित्ताने पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. रकूल प्रीत सिंग या सिनेमात अजयच्या गर्लफ्रेण्डच्या भूमिकेत दिसेल, तर तब्बू अजयची घटस्फोटित पत्नी आहे. याशिवाय मीटू प्रकरणात अडकलेले ज्येष्ठ अभिनेते अलोकनाथही यामध्ये अजयच्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. याशिवाय जावेद जाफ्री, जिमी शेरगिलही मुख्य भूमिकेत दिसतील. 'फूल और कांटे' सिनेमात अजयने ज्याप्रमाणे 'स्प्लीट' केला होता, त्याप्रमाणे 'दे दे प्यार दे' च्या पोस्टरमध्ये स्प्लीट करताना अजय दिसत आहे. त्यानंतर #SplitLikeAJ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्डिंगमध्ये होता. अकीव अलीने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा खांद्यावर घेतली आहे, तर लव रंजनने सिनेमाची निर्मिती केली आहे. 'दे दे प्यार दे' हा चित्रपट येत्या 17 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.