मुंबई : 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' आणि 'भाई' या चित्रपटानंतर आणखी एका मराठी चित्रपटाला मुंबईत दुजाभाव मिळत आहे. सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'लव्ह यू जिंदगी' चित्रपटाला स्क्रीन्स मिळत नसल्याची माहिती आहे.


मराठीला डावलून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांना स्क्रीन्स दिल्याचा आरोप चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला आहे. त्यामुळे रिलीजच्या तोंडावर निर्मात्यांची अस्वस्थता वाढली आहे.

'लव्ह यू जिंदगी' हा चित्रपट उद्या म्हणजेच 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात महागुरु सचिन पिळगावकरांसोबत कविता मेढेकर, प्रार्थना बेहरे, अतुल परचुरे मुख्य भूमिकेत आहेत. आयुष्याच्या उत्तरार्धात जीवनाकडे नव्याने पाहण्याचा दृष्टिकोन देणाऱ्या व्यक्तीची भूमिका पिळगावकर यामध्या साकारत आहेत.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एकही हिंदी चित्रपट रीलिज झाला नाही, मात्र रणवीर सिंहचा 'सिम्बा' दुसऱ्या आठवड्यातही गर्दी खेचत आहे. तर 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक', 'बटालियन 609', मनमोहन सिंह यांच्या आयुष्यावर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' आणि विजय माल्ल्यावर आधारित 'रंगीला राजा' असे चार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे मराठी सिनेमांना तगडी स्पर्धा असेल.

दुसरीकडे, पुलंच्या जीवनावर आधारित 'भाई' या चित्रपटाला पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. उद्या 'भाई'चा दुसरा आठवडा सुरु होत असून या मराठी सिनेमांचीही मोठ्या पडद्यावर टक्कर होईल. त्यामुळे 'लव्ह यू'ची वणवण थांबावी, हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.