मनाचं दशांगुळे भरून राहिलेला असतो.. सचिन सचिन...चा नाद... थिएटरमधून बाहेर पडत असताना तुम्ही सचिनमय झालेले असता. स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठीचं नव्याने बळ देणारा सचिन – अ बिलियन ड्रीम्स... आज आपल्यासमोर सचिनचा इतिहास सांगतो.
तसं पाहायला गेलं तर आज यूट्यूबवर व्हिज्युअल्सची बँक आहे. आपण हवी ती मॅच हव्या त्या क्षणी पाहू शकतो. पण सचिन अ बिलिअन ड्रीम्स पाहताना जाणवतं त्याला सचिनटच आहे. म्हणजे त्याची असणारी कॉमेण्ट्री.. त्याचं अनुभव कथन... त्या सगळ्या गोष्टींनी हा डॉक्युड्रामा एका वेगळ्या उंचीवर जातो. कारण त्याला लाभलाय परिसस्पर्श. क्रिकेटच्या सोनेरी इतिहासाचे साक्षीदार करणारं हे सचिनपर्व आहे.
तो आला, त्याने पाहिलं... त्याने जिंकलं... या सा-या गोष्टींचे आपण साक्षीदार आहोत... तरी हा सिनेमा पाहताना आपण भारावून जातो. इमोशनल होतो... त्या क्षणांच्या कोलाजमध्ये ती ताकद आहे. सचिनचा इम्पॅक्ट हा तसा आहे..
भारत पाक सामन्याची क्षणचित्रं पाहताना आपण तेवढेच एक्साइट झालेलो असतो. सचिनच्या फोअर अन् सिक्सेसला टाळ्या वाजवतो. अब्दुल कादरला मारलेले सिक्सर्स असतील शारजातील वाळूच्या वादळानंतर सचिनचं धावांच आलेलं वादळ... शेन वॉर्नच्या फिरकीला सीमारेषे पल्याडचा त्याने दाखवलेला रस्ता... अनेक टप्प्यांवर वर्ल्ड कपचं भंगलेलं स्वप्न ते विश्वविजेते होण्याचा... हातात वर्ल्डकप उचलून घेण्याचा 2011पर्यंत विश्वचषकापर्यंतचा प्रवास हा आपण अपेक्षित केलेला आहे, पण तरीही या पलीकडे जाणारा हा डॉक्युड्रामा आहे... कारण सचिन पल्याडचा आहे.
डोंगरापलीकडून उगवणाऱ्या सूर्यासारखा... स्वतः पेटलेला सूर्य.
घरी अगदी सारा झाली तेव्हापासूनच्या व्हिडिओजने होणारी सुरुवात. असे अनेक टप्पे आहेत. घरी टिपलेले काही महत्त्वाचे क्षण पहिल्यांदाच इथे पाहायला मिळतात. मैदानावरचा, मैदानाबाहेरचा मित्रांसोबतचा घरच्यांसोबतचा अगदी हाडामांसाचा सचिन आपल्याला इथे भेटतो. हे सचिन अ बिलिअन ड्रीम्सचं वैशिष्ट्य.
यशापयशाच्या या ऊनपावसाच्या खेळात सचिनच्या मनोवस्थेचं दर्शन घडवताना त्याचं आभाळ कवेत घेताना पाय जमिनीवर रोवलेलं असणं, या मागील त्याची तात्त्विक बैठक कशाप्रकारची आहे. एखाद्या गोष्टीकडे तो कशाप्रकारे पाहतो... विचारांमुळे माणसाच्या जगण्याची दिशा कशी ठरते, बदलत जाते अन् त्याच्या खुणावणा-या क्षितिजाकडे तो कशाप्रकारे झेप घेतो... याची यशोगाथा म्हणजे सचिन – अ बिलिअन ड्रीम्स.
त्या सगळ्या गोष्टींमध्ये घरच्यांपासून ते अगदी त्याच्यासोबत खेळलेल्या वा दिग्गज ज्येष्ठ खेळाडूंची, समलोचकांची त्याच्याबद्दलची मतं... त्याची भलामण करणारा डॉक्युड़्रामा असेल असं वाटत असताना त्याच्या अपयशाचा पाढाही निगुतीने वाचला गेलाय. कर्णधारपद असतानाचं धावांचं प्रेशर हा मुद्दा कसा केला गेला, याचं उत्तर त्याने दिलंय. आतापर्यंत सचिनवर अनेकदा टीका केली गेलीय. त्या सगळया गोष्टींवर सचिन त्या काळात कधीच रिअँक्ट झाला नाही, पण त्या सगळ्या गोष्टींकडे सचिन कशाप्रकारे पाहत होता.
सचिन ज्यावेळी विक्रम रचत होता... धावांचे डोंगर रचत होता. त्यावेळी त्याची मनस्थिती काय होती. ज्यावेळी कर्णधार झाला... त्यावेळी दडपण कशाचं होतं. सीनिअर खेळाडूंना नेमक्या कोणत्या मिरच्या झोंबल्या होत्या. काय सुरू होतं. त्याला मैदानाबाहेरच्या पॉलिटिक्सशी दोन हात करावे लागत असताना स्थितप्रज्ञ असलेल्या सचिनला अनेक अग्निदिव्यातून जावं लागलंय, याची चुणूक आपल्याला दिसते. त्याने अत्यंत हुशारीने पॉइण्ट आऊट केलं आहे.
काही फोटोजमधून अझरवर केलेली कमेण्टही महत्त्वाची ठरते. मॅचफिक्सिंगचा उल्लेख येतो. पण सचिनने हुशारीने त्यावर भाष्य करण्याचं टाळलंय अन् त्याला भावनिक किनार देऊन बगल दिली आहे.
सचिन निवृत्त स्वतःहून झाला की, त्याला व्हायला सांगितलं... यावर अनेक मतमतांतर क्रिकेट जगतात आहेत, पण त्यावरही भाष्य नाही. क्लायमॅक्सला थेट हात घातला गेलाय अन् त्याच्या स्टेडिअममधल्या भाषणात हे सगळं दाखवत असताना त्या भूतकाळाशी त्याने इतक्या तरलपणे नातं जोडलं आहे. त्या काळच्या सोशोपॉलिटिकल सिनॅरिओला त्याने उत्तम प्रकारे कनेक्ट केलं आहे.
दिग्दर्शक जेम्स रस्किनच्या या सादरीकरणाला स्पेशल ब्राऊनी पॉइण्ट्स. त्यामध्ये मिसाइल लाँच, राजीव गांधी हत्या, 1992चं खुले आर्थिक धोरण – जागतिकीकरण 2008 चा मुंबईवरील हल्ला या सगळया गोष्टींचे दाखले मिळतात... एकीकडे क्रिकेट खेळलं जात असताना भोवताल कसा होता, याच्याशी सांधलेपण दाखवण्याचा प्रयत्न वेगळा अन् उत्तम.
खाजगी व्हिडिओजमध्ये एक पिता, एक पती, मुलगा, भाऊ, मित्र म्हणून तो कसा आहे... या सगळया गोष्टी ओघाने येतात.
एका ठिकाणी मात्र गणेश चतुर्थी असा संदर्भ येतो अन् विसर्जनाचे व्हिज्युअल्स आपल्यासमोर येतात. मात्र ही एकमेव त्रुटी त्याकडे दुर्लक्ष करता येण्याजोगी आहे.
या सिनेमामध्ये एक वर्तुळ पूर्ण होतं. प्रा. रमेश तेंडुलकरांच्या उल्लेखाने सुरूवात अन् शेवट होतो. दरम्यान वडिलांची प्राजक्त ही कविता त्याच्या तोंडून ऐकत असताना त्याचा अन्वयार्थ वेगळ्या प्रकारे आपल्याला उमजतो.
संस्कार, विचार, स्वप्न अन् अपार मेहनत असं सारं काही आपल्याला सचिन अ बिलियन ड्रीम्समध्ये आपल्याला दिसतं अन् तेवढ्यात मुंबईत खेळाला सुरुवात होते अन् अखेरची इनिंगही तो मुंबईत खेळल्याचा दाखला देतो. त्यावेळी नियतीचा उल्लेख तो करतो... सचिन सचिनचा गजर भारतीयांचा विजय मंत्र आहे, याची जाणीव पुन्हा एकदा नव्याने होते... काही ठिकाणी इमोशनल करणारा, जिंकताना हात उंचावून आनंदाने एन्जॉय करावं असं वाटणारा, तो आऊट होतो त्यावेळी चं चं... च्या आवाजात थिएटरचं ही नव्याने मैदान झालंय, असा फिल देणारा.
म्युझिक माएस्ट्रो... ए. आर. रहमानचं संगीत मनाचा ताल ओळखून ठेका धरायला लावणारा... सिनेमाला तितकंच पूरक अन् वेगळ्या उंचीवर नेणारं... वंदे मातरम ज्याप्रकारे वापरलंय... त्याला तोड नाही.
सिनेमाचं कास्टिंग ज्याप्रकारे रोहन मापुस्करने केलंय. त्याला तोड नाही. छोट्या सचिनपासून ते अगदी द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर कमाल वाटतात. नितिन चंद्रकांत देसाई यांचं प्रॉडक्शन डिझाइन कमाल वाटतं.
स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवणारा... मेहनतीला शॉर्टकट नसतो हे दाखवणारा 'सचिन अ बिलियन ड्रीम्स'...प्रतिभावंत कवी ग्रेस यांच्या शब्दात सांगायचं झालं तर
काळोख उजळण्यासाठी जळतात जिवाने सगळे
जो वीज खुपसतो पोटी तो एकच जलधर उजळे...
इतिहासाची सोनेरी पानं उलगडणारं सचिनपर्व आहे हे.
का पाहावा – सचिन अन् सचिन अन् सचिनसाठीच
का टाळावा – फारशी कारणं नाहीत... क्रिकेटच्या देवाला भेटायचं नसेल तर
थोडक्यात काय – सचिनला नव्याने भेटण्याची सुवर्णसंधी... या सचिनपर्वाला मी देतो चार स्टार्स.