हैदराबाद : ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ सिनेमाला ऑस्कर नामांकन न मिळाल्याने आपण नाराज नसल्याचं दिग्दर्शक एस.एस. राजामौलीने स्पष्ट केलं आहे. तसेच कथानकाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आणि आणि पुरस्कार मिळवण्याऐवजी टीमसाठी पैसे कमावणं हा आपला मुख्य उद्देश असल्याचं त्यानं यावेळी सांगितलं.

ऑस्कर नामांकनाबद्दल राजामौली म्हणतो की, “ऑस्करच्या शर्यतीत बाहुबलीला नामांकन न मिळाल्याने मी नाराज नाही. जेव्हा मी सिनेमा बनवतो, तेव्हा कधीही पुरस्काराबद्दल विचार करत नाही. एखादी कथा मला आवडली, तर ती जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा माझा मुख्य उद्देश असतो. तसेच सिनेमाच्या निर्मितीत ज्यांनी स्वत: ला झोकून दिलं, त्यांच्यासाठी पैसे कमावणं हे माझं लक्ष्य असतं.”

तो पुढे म्हणाले की, “जर एखादा पुरस्कार मिळतो, तेव्हा मला नक्कीच आनंद होतो. पण जर नाही मिळाला, तर मी त्यावर शोक व्यक्त करत बसत नाही. कारण ते माझ्या तत्वात बसत नाही.”

मराठमोळा दिग्दर्शक अमित मसुरकर दिग्दर्शित ‘न्यूटन’ सिनेमाला नुकतंच ऑस्करचं नामांकन मिळालं. पण ऑस्करच्या शर्यतीत यापूर्वी ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ हा सिनेमा असल्याची जोरदार चर्चा होती.

राजामौलीच्या 'बाहुबली 2' सिनेमाने जगभरात चांगली कमाई केली. या सिनेमाने तब्बल 1000 कोटीपेक्षा अधिकची कमाई करुन, भारतीय बॉक्स ऑफिसवरील ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता.

सिनेमा हिट होणार याची पूर्वकल्पना असल्याचे सांगत, उत्तर भारतातही या सिनेमाने तुफान कमाई केल्याचं अश्चर्य वाटत असल्याचंही राजामौलीने यावेळी सांगितलं.

सिनेमाच्या बजेटबद्दल राजामौली म्हणाला की, “या दोन्ही सिनेमांचं (बाहुबली 1 आणि बाहुबली 2) बजेट एकूण 150 कोटी रुपये होतं. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला नक्की उतरेल, याचा विश्वास असल्याने, आम्ही या सिनेमा निर्मितीचं काम सुरु केलं.”