'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2017 04:03 PM (IST)
'रिलेशनशीपमध्ये जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात, तेव्हा काही गोष्टी घडतात. याचा अर्थ तो बलात्कार होता, असा होत नाही, असं महमूद फारुकी यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.
नवी दिल्ली : 'पीपली लाईव्ह' चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी यांची बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अमेरिकन संशोधक महिलेने फारुकींवर बलात्काराचा आरोप केला होता. मात्र दिल्ली हायकोर्टाने सोमवारी फारुकींची बलात्काराच्या आरोपातून सुटका केली. बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळलेले महमूद फारुकी यांना सात वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला होता. मात्र दिल्ली हायकोर्टाने तिहार जेलमधून त्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. खंडपीठाने बलात्कार प्रकरणाची सत्यता पडताळून पाहिली. घटनेच्या वेळी पीडितेच्या संमतीविना शारीरिक संबंध ठेवले का, असा प्रश्न कोर्टाने विचारला. तक्रारदार महिलेने संमती दिली नसल्याचं आरोपीला समजलं होतं का, असंही हायकोर्टाने विचारलं. 'त्या दिवशी असं काही झालंच नाही' असा दावा महमूद यांच्या वकिलाने कोर्टात केला. तक्रार नोंदवण्यापूर्वी अमेरिकन तरुणीने फारुकींना केलेले मेसेजेसही वकिलाने कोर्टात सादर केले. जानेवारी 2015 पासून दोघं जण रिलेशनशीपमध्ये असल्याचंही वकिलांनी सांगितलं. 'रिलेशनशीपमध्ये जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात, तेव्हा काही गोष्टी घडतात. याचा अर्थ तो बलात्कार होता, असा होत नाही. तक्रारदार महिलेचा जबाब तिने सादर केलेल्या पुराव्यांशी विसंगत आहे' असंही वकिलांनी कोर्टात सांगितलं.