1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2017 02:54 PM (IST)
1983 मध्ये भारताला मिळालेल्या अनपेक्षित विश्वचषक विजेतेपदाभोवती या चित्रपटाची कथा फिरते.
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या क्रीडा विषयावरील चित्रपटांचं वारं वाहू लागल्याचं पाहायला मिळत आहे. भारताच्या पहिल्या क्रिकेट विश्वचषक विजेतेपदावर लवकरच चित्रपट तयार केला जाणार आहे. यामध्ये आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. रणवीर लवकरच सुशांत सिंग राजपूत, फरहान अख्तर, प्रियंका चोप्रा, श्रद्धा कपूर यांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे. धोनी, मिल्खा सिंग, सायना नेहवाल, मेरी कोम, खली यांच्यानंतर आता कपिल देव यांच्यावर चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी दिली आहे. यापूर्वी कपिल देव यांची भूमिका अर्जुन कपूर साकारणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र तरण आदर्श यांच्या ट्वीटमुळे रणवीरच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. 1983 मध्ये भारताला मिळालेल्या अनपेक्षित विश्वचषक विजेतेपदाभोवती या चित्रपटाची कथा फिरते. https://twitter.com/taran_adarsh/status/912155950663983104 कबीर खान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. एक था टायगर, सुलतान, बजरंगी भाईजान, फॅन्टम यासारखे अनेक गाजलेले चित्रपट कबीर खान यांनी दिले आहेत. सेलिब्रेटी क्रिकेट लीगचे व्यवस्थापकीय संचालक विष्णू वर्धन इंदुरी आणि फॅन्टम फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. गेल्या साडेतीन वर्षांपासून ते या चित्रपटासाठी जुळवाजुळव करत आहेत. रणवीर सिंगची भूमिका असलेला 'पद्मावती' येत्या 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात तो अल्लाऊद्दीन खिल्जीच्या नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.