पुणे: 'सैराट या सिनेमात आंतरजातीय विवाह केला म्हणून आर्ची आणि परश्याची हत्या करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे. मीपण आंतरजातीय विवाह केलेला आहे. परंतु माझी हत्या कोणी करू शकलं नाही.' अशी प्रतिक्रिया आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली आहे. ते आज पुण्यात बोलत होते.


 

'सैराट सिनेमाबाबत बरीच चर्चा सुरु आहे. आतंरजातीय विवाहाकडे सर्व समाजाचं लक्ष वेधणारा हा सिनेमा आहे. अनेक चित्रपटानं मागे टाकून या सिनेमानं ५५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपट हा समाजाला जोडण्याचं काम करतो.' असं म्हणत रामदास आठवले यांनी या सिनेमाचं आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं कौतुक केलं आहे.

 

'आज 16 मे आहे. आजच्याच दिवशी माझा आंतरजातीय विवाह झाला होता. सैराट सिनेमाही याच विषयावर बेतलेला आहे. त्यात दोघांची हत्या केल्याचं दाखवलं आहे. मात्र, मी आंतरजातीय विवाह केल्यानंतर माझी काही हत्या करण्यात आली नाही.' असं वक्तव्य आठवले यांनी केलं

 

'काही ठिकाणी सैराटसारख्या घटना घडत आहे. त्यामुळे समाजाला एकत्र कसं आणायचं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मी हा सिनेमा अजून पाहिलेला नाही. मात्र, माझाही आंतरजातीय विवाह झाल्यामुळे आता मी देखील सैराट पाहणार आहे. त्याचबरोबर आपणही सर्वांनी सैराट सिनेमा नक्की पहावा.' असा सल्लाही आठवलेंनी दिला आहे.