मुंबई : लय भारी चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर अभिनेता रितेश देशमुख ‘माऊली’ या चित्रपटातून पुन्हा भेटीला येत आहे. रितेशने या आपल्या आगामी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करत रिलीज डेट जाहीर केली.

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्यानंतर लगेचच ट्वीटच्या माध्यमातून रितेशने हे पोस्टर प्रसिद्ध केले. ‘माऊली’ हा रितेशचा दुसरा मराठी चित्रपट असून 21 डिसेंबर 2018 ला प्रदर्शित होणार आहे.


आदित्य सरपोतदार या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर जेनेलिया देशमुख सिनेमाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाची कथा क्षितीज पटवर्धन याने लिहिली असून  प्रसिद्ध गायक अजय-अतुल या चित्रपटाचं संगीत लयबद्ध करणार आहे.

‘माऊली’ चित्रपटात प्रमुख भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पण चित्रपटाच्या पोस्टरमधून प्रमुख भूमिका कोण साकारणार हे स्पष्ट होत नाही आहे. तरी देखील ‘माऊली’ या नावाला साजेसा असा चित्रपटाचा पोस्टर आहे.

रितेश देशमुखचा लय भारी हा मराठी सिनेमा प्रचंड गाजला होता. त्यातली माऊली ही भूमिका एवढी लोकप्रिय झाली, की रितेश देशमुखला चाहते आजही माऊली नावाने हाक मारतात.