मुंबई : बॉलिवूडमधील काही रोमँटिक कपलमध्ये सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांचाही समावेश होता. मात्र सध्या हे दोघेही आपापल्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. इतकंच नाही तर दोघांना एकमेकांना भेटण्यासाठीही वेळ मिळत नाही. आता असं म्हटलं जात आहे की, दोघांनी या रिलेशनशिपमधून ब्रेक घेतला आहे.
कृती सध्या लंडनमध्ये 'हाऊसफुल 4' चं शूटिंग करत आहे. तर सुशांत जमशेदपूरमध्ये 'किजी और मॅनी' या सिनेमात व्यस्त आहे. हा चित्रपट द फॉल्ट इन अवर स्टार्स या अमेरिकन सिनेमाचा रिमेक आहे. काही वृत्तानुसार, सुशांतला आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करायचं असून त्याच्याकडे रोमान्ससाठी वेळ नाही. सुशांतला आपल्या अभिनयासाठी चर्चेत राहायचं आहे, रोमान्ससाठी नाही.
'राब्ता' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सुशांत आणि कृती यांचं अफेअर सुरु झाल्याची चर्चा होती. दोघांमधील जवळीक वाढल्यामुळे सुशांत आणि त्याची आधीची गर्लफ्रेण्ड अंकिता लोखंडेसोबतचं नातं तुटलं होतं. मात्र सुशांत आणि कृती यांच्यापैकी कोणीही आपल्या नात्याबद्दल अधिकृत काहीही वक्तव्य केलं नाही. आम्ही दोघे फक्त मित्र आहोत, असंच ते वारंवार सांगत होते.