मुंबई : बॉलिवूडमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण करणारा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आपल्या मातृभाषेला विसरलेला नाही. 'लय भारी'सारखा चित्रपट असो, 'विकता का उत्तर?' सारखा गेम शो किंवा 'थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो' हा म्युझिक व्हिडिओ, रितेश वारंवार मराठीमध्ये डोकावताना दिसतो.


रितेश आता 'माऊली' या चित्रपटातून पुन्हा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे रितेशसोबत बॉलिवूडमधील एक अभिनेत्री मराठीत पदार्पण करत आहे. 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली अभिनेत्री संयमी खेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

संयमी ही प्रसिद्ध अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे. 'लय भारी'मध्ये रितेशच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तन्वी आझमी यांची ती भाची. संयमीचा जन्म नाशिकमध्ये झाला होता.

मुंबई फिल्म कंपनी अंतर्गत रितेशने काहीच दिवसांपूर्वी 'माऊली' सिनेमाची घोषणा केली होती. आदित्य सरपोतदार सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेत आहेत. 2019 मध्ये 'माऊली' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.