मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेले काही महिने एका आजारावर उपचार घेत होते. ऋषी कपूर यांना कर्करोगाने ग्रासल्याच्या अफवा कपूर कुटुंबाने उडवून लावल्या होत्या. तरीही, ऋषी कपूर यांच्या प्रकृतीबाबत दिलासा देणारी एक बाब समोर आली आहे.

ऋषी कपूर कर्करोगमुक्त झाल्याच्या वृत्ताला त्यांचे मोठे बंधू रणधीर कपूर यांनी दुजोरा दिला आहे. एबीपी न्यूजशी बोलताना रणधीर कपूर म्हणाले की, "होय, ऋषी कर्करोगमुक्त झाले आहेत. पण त्यांना यासंदर्भात एक मेडिकल कोर्स पूर्ण करावा लागेल, त्यानंतरच ते भारतात परत येऊ शकतील." मात्र त्यांनी ऋषी कपूर यांची भारत परतण्याची निश्चित तारीख सांगितलेली नाही.

त्याआधी 'ऋषी कपूर कर्करोगमुक्त झाले आहेत' अशा आशयाची फेसबुक पोस्ट दिग्दर्शक राहुल रवैल यांनी पोस्ट केली होती. रवैल यांनी ऋषी कपूरसोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे.

एकीकडे, ऋषी कपूर यांना कर्करोग झाला होता, याचे संकेत मिळाले आहेत, तर दुसरीकडे त्यांची प्रकृती सुधारल्याची आनंददायी बातमी आहे. ऋषी कपूर कर्करोगमुक्त झाल्याचं वाचून चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

गेल्या सात महिन्यांपासून त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र कपूर कुटुंबाने त्यांच्या आजारपणाविषयी जाहीर वाच्यता करणं टाळलं आहे.



ऋषी कपूर यांची पत्नी आणि अभिनेत्री नीतू सिंग यांनी नववर्षाच्या स्वागतावेळी टाकेलील इन्स्टाग्राम पोस्ट सर्वांच्या भुवया उंचावणारी होती. 'कॅन्सर ही फक्त राशिचक्रातील रास राहू दे' अशा आशयाची पोस्ट करत ऋषी कपूर यांच्या आजारपणाविषयी अप्रत्यक्ष संकेत दिले होते.

यापूर्वी ऋषी कपूर यांना कर्करोग झाल्याच्या अफवा बंधू रणधीर कपूर यांनी धुडकावल्या होत्या. नेमकं निदान झाल्याशिवाय कुठलंही भाष्य करणं योग्य नसल्याचं ते म्हणाले. वैद्यकीय उपचारांमुळे ऋषी कपूर त्यांची आई कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित नव्हते.


'रातोरात माझे केस राखाडी/पांढरे झाल्यामुळे काही अफवा माझ्याबाबत फिरत आहेत. हनी त्रेहान आणि सोनी पिक्चर्सची निर्मिती असलेल्या एका सिनेमासाठी अॅवन काँट्रॅक्टरने माझे केस रंगवले आहेत. हितेश भाटिया दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव अजून ठरलेलं नाही.' असं ट्वीट ऋषी कपूर यांनी ऑक्टोबर महिन्यात केलं होतं.

दरम्यानच्या काळात सोनाली बेंद्रे, राकेश रोशन, नफिसा अली यासारख्या बॉलिवूड कलाकारांनाही कर्करोगाचं निदान झालं होतं. तर न्यूरोएंडोक्राईन ट्यूमरशी झुंजणारा अभिनेता इरफान खानही उपचार घेऊन सुखरुप परतला आहे.