नवी दिल्ली : पुरस्कार पदरात पाडून घेण्यासाठी कधीकाळी आपण 30 हजार रुपये मोजल्याची कबुली प्रख्यात अभिनेते ऋषी कपूर यांनी दिली आहे. दिल्लीमध्ये 'खुल्लम-खुल्ला, ऋषि कपूर अनसेन्सर्ड' या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात ऋषी कपूर बोलत होते.
अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यामुळे माझं करियर धोक्यात आलं होतं. आपल्याला अवॉर्ड मिळाला नाही, तर आपली कारकीर्द संपुष्टात येईल, अशी भीती त्यावेळी वाटल्याचं ऋषी कपूर यांनी सांगितलं.
त्याचवेळी एका व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधून 30 हजार रुपये मोजल्यास पुरस्कार मिळवून देईन, असं आश्वासन दिलं. यात फसवणूकही शक्य होती. त्यामुळे मी पुरस्कार विकत घेण्यासाठी 30 हजार मोजल्याची कबुली ऋषी कपूर यांनी दिली.
तो पुरस्कार फिक्स होता, असं मी मानत नाही. कदाचित तो फिक्स नसूही शकतो. संबंधित पुरस्कार मला मिळालाही, मात्र तो 30 हजारांमुळे मिळाला, की आपल्या अभिनयामुळे हे मात्र आजपर्यंत कळू शकलं नसल्याची मिष्किल टिपणीही त्यांनी केली.
मी एका रोमँटिक सिनेमातून पदार्पण केलं, तर जंजीरमधून अमिताभ बॉलिवूडमध्ये आला. त्याच्या अँग्री यंग मॅनच्या इमेजमुळे सगळी समीकरणं बदलली होती. कोणाला रोमँटिक हिरो नको होता, फक्त अॅक्शन हिरो हवा होता, मला असं वाटलं की मी पाण्यात फेकला गेलोय, मी आयुष्यभर संघर्ष करत राहिलो, असं ऋषी कपूर म्हणाले.
'खुल्लम-खुल्ला, ऋषि कपूर अनसेन्सर्ड' या ऋषी कपूर यांच्या आत्मचरित्रात चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी वाचायला मिळणार आहेत. ऋषी कपूरने 1973 मध्ये वडील राज कपूर यांच्या बॉबी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आजपर्यंत त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत.