मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री रिंकू राजगुरुची प्रमुख भूमिका असलेला 'कागर' हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेमाचा उत्सव साजरा करणार आहे.


सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी 'कागर'चं दिग्दर्शन केलं आहे. वडील-मुलाच्या नात्यावर आधारित 'रिंगण' आणि चार शाळकरी मुलांची गोष्ट असलेला 'यंग्राड' हे दोन चित्रपट मकरंदने या पूर्वी दिग्दर्शित केले होते. रिंगण आणि यंग्राड हे दोन्ही चित्रपट भिन्न पद्धतीचे होते. त्यामुळे आता कागर या चित्रपटाविषयी नावापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. मूळचे अकलूजचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मकरंद आणि रिंकु या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.



'कागर'चं पोस्टरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका पडद्याआड उभी असलेली रिंकू या पोस्टरमध्ये पाहायला मिळते. पोस्टरमध्ये पडदा त्यावर आजूबाजूला असलेल्या वेलींचा गराडा अन् त्यात रिंकूच्या असलेला दिसण्यातला साज अन् नजरेतील करारीपणा विलक्षण आहेत. मात्र त्यामुळे कथानकाचा काहीच अंदाज बांधता येत नाही. या पोस्टरमुळे चित्रपटाचं कथानक आणि रिंकूसह असलेल्या स्टारकास्टविषयी उत्सुकता नक्कीच वाढली आहे.

14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे अजून फुलवायला, एकमेकांमधलं नातं घट्ट करायला आणि नजरेतल्या भावना अलगद अनुभवण्यासाठी आम्ही 'कागर' घेऊन येत आहोत,' असं मकरंदने 'कागर'विषयी सांगितलं.