आरोपी सुभाषने तक्रारदार अभिनेत्रीसोबत अनेक वेळा लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्याच्या लेडीज वॉशरुममध्ये त्याने पुन्हा अभिनेत्रीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत राहणाऱ्या 23 वर्षीय अभिनेत्रीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. गेल्या दोन वर्षांपासून एका मराठी चित्रपटाचं राज्यात विविध ठिकाणी शूटिंग सुरु आहे. सुभाष यादवने संबंधित अभिनेत्रीशी लगट करण्याच्या उद्देशाने अनेकदा फोन केला. त्याला अभिनेत्रीने कुठलाही प्रतिसाद दिला नाही, तरीही सुभाषने तिचा पाठलाग सोडला नाही.
आरोपीने बदनामी करण्याची धमकी दिल्यामुळे अभिनेत्रीने त्याला भेटण्यासाठी चतु:श्रुंगी मंदिर परिसरात समजावून सांगण्यासाठी बोलावलं. मात्र त्याने पुन्हा बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे अभिनेत्रीच्या ड्रायव्हरने पोलिसांना फोन केला. दोन पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आरोपीला पांडवनगर पोलिस चौकीत नेलं.
त्यावेळी आरोपी सुभाष यादवने अभिनेत्रीची माफी मागितली. त्यामुळे तिने सुभाषविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुभाषने त्यांना पुन्हा टार्गेट करणं सुरु केलं. त्यामुळे तिने पोलिसात धाव घेतली.