Saif Ali Khan Case : अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे. सैफ अली खानवर 16 जानेवारीला मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास हल्ला करण्यात आला. चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसलेल्या मोहम्मद शहजादने सैफवर चाकू हल्ला करुन पळ काढला. हल्लेखोराने सैफ अली खानवर धारदार शस्त्राने सपासप वार केला आणि जखमी अवस्थेत त्याला पाहताच पळ काढला. चाकू हल्ल्यामुळे जखमी झालेल्या सैफला रिक्षामधून रुग्णालयात नेण्यात आलं, यावेळी देवदूत बनून आलेल्या रिक्षाचालकाने रिक्षाचं भाडंही घेतलं नाही. ज्या रिक्षाचालकाने सैफला रुग्णालयात नेलं, त्याचा खास सन्मान करण्यात आला आहे.
सैफसाठी देवदूत ठरलेल्या 'त्या' रिक्षाचालकाचा खास सन्मान
रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या सैफ अली खानला रिक्षामधून रुग्णालयात लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. सैफचा ड्रायव्हर उपलब्ध नसल्याने त्याला रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी रिक्षाचालकाने एकही रुपया भाडं घेतलं नव्हतं, सैफसाठी देवदूत बनलेल्या रिक्षाचालक भजनसिंह राणा याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आता या रिक्षाचालकाचा रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर फैजान अंसारीने रिक्षाचालक भजन सिंह याचा रोख रक्कम 11 हजार रुपये बक्षीस देत त्याचा सत्कार केला.
"एका व्यक्तीचा जीव वाचवल्याचा मला खूप अभिमान"
सत्कार केल्यामुळे भजन सिंह राणा यांनी आनंद व्यक्त केला, आपण गरजू व्यक्तीच्या कामी आलो, याचं समाधानही त्यांनी व्यक्त केलं. यावेळी भजन सिंह राणा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "मला खूप अभिमान वाटत आहे. माझ्या आयुष्यात असं काही घडेल, असा प्रसंग येईल, याचा मी कधी विचारही केला नव्हता. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहतो, तेव्हा आपल्याला भीती वाटते. आपण पोलिस केसमध्ये तर अडकणार नाही ना, हा विचारही एक क्षण मनात आला. पण, मला अभिमान आहे की, त्या परिस्थितीत घाबरुन न जाता मी एका जखमी व्यक्तीची मदत केली आणि त्याचा जीव वाचवला. या गोष्टीचा मला खूप आनंद आहे."
रिक्षाचालकाने सांगितला घडलेला प्रसंग
ऑटोरिक्षा चालक भजन सिंह राणा सैफ अली खानसाठी तारणहार ठरला कारण दुसरा कोणताही ड्रायव्हर उपलब्ध नसताना त्याने सैफला तातडीने रुग्णालयात नेलं. रिक्षाचालकाने घडलेला प्रसंग सांगिताना म्हटलं की, "मी इमारतीजवळून जात होतो, तेव्हा अचानक मला कोणीतरी ऑटो हाक मारल्याचा आवाज आला. एक महिला घाबरून गेटमधून बाहेर आली आणि मदत मागितली. काही मिनिटांनंतर, सैफ अली खान, इतर काही जणांसह, बाहेर आला आणि माझ्या ऑटोमध्ये बसला. त्याने पांढरा कुर्ता घातला होता आणि तो रक्ताने माखलेला होता".
महत्त्वाच्या इतर बातम्या :