आमीर खानने त्याच्या सिनेमांचा एक स्टॅण्डर्ड सेट केलाय.  'लगान'पासून त्याने केलेला प्रत्येक सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय. गोष्ट निवडणं असो वा दिग्दर्शक आमीरने आजवर खेळलेला प्रत्येक डाव यशस्वी झालाय. 'सिक्रेट सुपरस्टार' हा सिनेमासुद्धा त्याला अपवाद नाही.

इन्सिया नावाच्या मुलीची ही गोष्ट. खरं तर गोष्ट खूप वेगळी किंवा खूप स्पेशल अशी नाही पण ती ज्या पद्धतीने मांडलीय त्याला तोड नाही.

आमीर खान जेव्हा सिनेमा करतो तेव्हा तो दोन गोष्टी बघतो. पहिली म्हणजे कथा आणि दुसरी म्हणजे दिग्दर्शक. त्या कथेला तो दिग्दर्शक न्याय देऊ शकेल याची पुरेपूर खात्री पटेपर्यंत आमीर सिनेमाला हात घालत नाही. पण एकदा खात्री पटली की मग तो दिग्दर्शक जुना आहे की नवीन याचा तो अजिबात विचार करत नाही. अद्वैत चंदनच्या बाबतीत नेमकं हेच घडलंय.  धोबी घाट, तारे जमीं पर अशा सिनेमांसोबत अद्वैतचं नाव जोडलं गेलंय. अर्थात निर्मिती सहाय्यक किंवा व्यवस्थापक म्हणून. पण दिग्दर्शक म्हणून त्याने जी मजल गाठलीय ती कमाल आहे.

जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर पाहिला होता तेव्हा वाटलं होतं की आमीरने सगळी गोष्ट सांगून टाकलीय पण सिनेमा पाहताना तो ट्रेलरपलीकडचा आहे ते अवघ्या काही मिनिटांत लक्षात येतं.

आई आणि मुलीचं नातं, दोघींची स्वप्नं, त्यासाठीचा संघर्ष, लिंगभेद असं बरंच काही या सिनेमात आहे. अर्थात हे सगळं आजवर आलेल्या अनेक सिनेमातून मांडलं गेलंय. त्यामुळे विषयात तसं वेगळेपण नाहीये पण ज्या पद्धतीने ते  सगळं मांडलंय ते अनुभवण्यासारखं आहे. कागदावर लिहिली गेलेली गोष्ट तितक्याच ताकदीने पडद्यावर उतरवली जाईल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. आमीरला मात्र ते गणित जमलंय असं नक्कीच म्हणू शकतो.

झायरा वसिमच्या अभिनयाबद्दल बोलावं तेवढं कमीच. आमीर खानचा शक्ती कुमार तर भन्नाट आहे. त्यासाठी त्याने घेतलेली मेहनत जाणवते. इन्सियाच्या आईच्या भूमिकेत दिसणारी मेहर विज या सिनेमातली खरी 'सिक्रेट सुपरस्टार' आहे हे सिनेमा पाहाताना जाणवतं. राज अर्जुनने साकारलेला खुनशी बाप खलनायक म्हणून तितक्याच ताकदीने आपल्या समोर येतो.

संगीत ही या सिनेमाची सगळ्यात मोठी बाजू. जवळपास आठ गाणी या सिनेमात आहेत. पण ती सगळी कथाप्रवाहात अगदी आपसूकपणे येतात. कुठेही कथेला वरचढ होत नाहीत. अमित त्रिवेदीने त्याची जादू पुन्हा एकदा दाखवून दिलीय. संकलन, सेट्स आणि कॅमेऱ्याच्या बाबतीत 'सिक्रेट सुपरस्टार' कुठेच निराश करत नाही.

थोडक्यात हा सिनेमा टाळू नये असाच आहे. या सिनेमाला देतोय साडेचार स्टार्स.