चेन्नई : जीएसटी पथकाने सोमवारी तमिळ अभिनेता आणि निर्माता विशालच्या कार्यालयावर आणि प्रोडक्शन हाऊसवर छापा टाकला. विशालच्या प्रोडक्शन हाऊसने जीएसटी कर भरण्यामध्ये अफरातफर केल्याचा संशय जीएसटी पथकाला आहे. त्यामुळे हा छापा टाकण्यात आला असल्याची माहिती आहे.


विशाल तामिळनाडू चित्रपट निर्माता कौन्सिलचा अध्यक्षही आहे. जीएसटी पथकाला विशालच्या प्रोडक्शन हाऊसकडून सर्व आवश्यक ती कागदपत्र देण्यात आल्याचं वृत्तही स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे. जीएसटीतून पळवाटा काढणाऱ्यांचा शोध घेणं हे जीएसटी इंटेलिजेन्स टीमचं काम आहे.

https://twitter.com/ANI/status/922438589069238273

विशाल फिल्म फॅक्ट्रीने आतापर्यंत 6 सिनेमांची निर्मिती केली आहे. या सर्व सिनेमात मुख्य भूमिका विशालनेच साकारली आहे. सिनेमे पायरेट करणाऱ्यांना पकडून देणाऱ्यांना बक्षिस दिलं जाईल, ही घोषणा केल्यामुळे काही दिवसांपूर्वीच विशाल चर्चेत आला होता.

मर्सल या सिनेमात जीएसटी संबंधित दृष्य दाखवण्यात आले आहेत. ही दृष्य हटवण्याची मागणी भाजप नेते एच राजा यांनी केली होती. एच राजा यांच्यावरही विशालने निशाणा साधला होता. त्यानंतर ही कारवाई झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.