कथा, कादंबऱ्यांचा मोह सिनेमा बनवण्यासाठी होऊच शकतो. यापूर्वी अनेकदा तसा प्रयत्न झाला आहे. फक्त असं माध्यमांतर करताना, कादंबऱ्यांतून मिळणारा आनंद रसिकांना देता यावा यासाठी दिग्दर्शकाला कंबर कसावी लागते. अरुण साधू यांच्या 'झिपऱ्या' या कादंबरीवर बेतलेला 'झिपऱ्या' हा नवा सिनेमा आला आहे. केदार वैद्य दिग्दर्शित या सिनेमाची गेले अनेक महिने प्रतीक्षा होती.
कादंबरी वाचली असेल तर तुम्हाला हा सिनेमा नेमका काय आहे ते कळायला मदत होईल. पण नसेल वाचली, तरी हरकत नाही. त्याची गोष्ट अशी, 'झिपऱ्या' नावाचा एक बूटपॉलिश करुन गुजराण करणारा मुलगा आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. आई, बहीण आणि तो असं त्रिकोणी कुटुंब. फार मोठ्या अपेक्षा नाहीत, मोठी स्वप्न नाहीत. आलेला दिवस काहीतरी कमावून निभावून न्यायचा आणि आपल्या बहिणीचं लग्न लावून द्यायचं इतकीच त्याची अपेक्षा. नाऱ्या, अस्लम, पुम्ब्या असं त्याचं मित्रमंडळही आहे. आपलं जगणं जगताना आपल्या मित्रांनाही नीट जगता यावं अशी त्याची अपेक्षा, पण बदलत्या काळाचं भान त्याला आहे. या परिस्थितीशी तो कसे दोन हात करतो, त्यात त्याला कशा अडचणी येतात याची ती गोष्ट आहे.
ही कादंबरी आजची नाही. जवळपास 25 वर्षांपूर्वी ही कादंबरी साधू यांनी लिहिली आहे. पण त्याचा सिनेमा बनवताना दिग्दर्शकाने आजचा काळ निवडला आहे. म्हणजे, या सिनेमात आजच्यासारख्या लोकल ट्रेन, मोबाईल आदी गोष्टी दिसतात. इथे थोडी गल्लत झाली आहे. म्हणजे कादंबरीत असलेले प्रसंग हे त्या काळातले होते. मात्र सिनेमा करताना या प्रसंगांचंही पुनरावलोकन करायला हवं होतं असं वाटून जातं. म्हणजे, सिनेमाच्या सुरुवातीलाच झिपऱ्या आणि पिंगळ्याची भांडणं होतात आणि या भांडणातून अपघाताने पिंगळ्याचा जीव जातो. या स्थितीतून झिपऱ्या तिथून पळून येतो. आता हा प्रसंग पंचवीस वर्षापूर्वी होऊ शकतो. कारण त्याकाळी मोबाईल, सीसीटीव्ही कॅमेरे असे प्रकार स्टेशनवर नव्हते. आज असा प्रकार घडला तर तिसऱ्या मिनिटाला पोलीस पकडतात. हा बदलता काळ सिनेमात दिसत नाही. बूटपॉलिश करुन गुजराण करता करता काही काळानंतर त्याचा धंदा कमी होतो. खरंतर बदलत्या काळानुसार हे होणं समजू शकतं. तो बदलता काळ यात आणखी ठाशीव दिसायला हवा होता. हा सिनेमा तांत्रिकदृष्ट्या चौकटीत बसवला आहे. पण तो भिडत नाही. त्यातल्या भावनांचा कल्लोळ, संघर्ष, घालमेल आणखी असायला हवी होती असं वाटत राहतं.
चिन्मय कांबळी याने यात 'झिपऱ्या'ची भूमिका निभावली आहे. तर त्याच्यासह यात अमृता सुभाष, सक्षम कुलकर्णी, प्रथमेश परब, हंसराज जगताप, प्रवीण तरडे यांच्याही भूमिका आहेत. यात अमृताने आपल्या भूमिकेला पुरेसा न्याय दिला आहे. पण झिपऱ्या आणि मित्रमंडळींच्या भावदुनियेतली रोलर कोस्टर राईड आणखी हवी होती असं वाटत राहतं. म्हणजे, साधू यांची कादंबरी ज्याने वाचली त्याने ती आपआपल्या परीने समजून घेतली असेलच. पण हा सिनेमा पाहिल्यानंतर वाटत राहतं, की लेखक अरुण साधू यांना या कादंबरीतून नेमकं काय सांगायचं होतं? म्हणजे, त्यांना झिपऱ्याचा संघर्ष दाखवायचा होता, की त्यावेळच्या सामाजिक स्थितीवर भाष्य करायचं होतं? की फक्त गोष्ट म्हणून झिपऱ्यासारख्या मुलांच भावविश्व उलगडून दाखवायचं होतं? हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यातले अंडरकरंट लक्षात येत नाहीत. बरं, ती केवळ गोष्ट म्हणून घ्यावी तर ती भिडत नाही. तुमच्या किमान अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करतो. म्हणून ही एक अॅव्हरेज फिल्म होते.
संगीताबाबत यातली गाणी श्रवणीय आहे, पार्श्वसंगीत मात्र कानाला खटकणारं. तोचतोचपणा आणणारं. एकूणात, हा सिनेमा पाहिल्यानंतर यात आणखी काहीतरी सांगायचं होतं, पण ते सांगायचं राहून गेलंय की काय असं वाटत राहतं. त्यामुळे हा सिनेमा अॅव्हरेज होतो. अमृता सुभाष, अरुण साधू यांचे चाहते असाल तर हा सिनेमा पाहायला हरकत नाही. बुटपॉलिश करणाऱ्या मुलांचं विश्व पाहण्याची संधी हा सिनेमा देतो. बाकी आपकी मर्जी.
झिपऱ्या : सांगता सांगता राहून गेलेली गोष्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jun 2018 12:13 PM (IST)
आपलं जगणं जगताना आपल्या मित्रांनाही नीट जगता यावं अशी त्याची अपेक्षा, पण बदलत्या काळाचं भान त्याला आहे. या परिस्थितीशी तो कसे दोन हात करतो, त्यात त्याला कशा अडचणी येतात याची ती गोष्ट आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -