लोकेश गुप्ते हा अभिनेता आता दिग्दर्शनात उतरला आहे. आपला पहिला सिनेमा निवडताना त्याने विषय घेतला आहे तो मुलांचा. मुलांचा म्हणजे फक्त मुलांचा नव्हे, तर पालक-पाल्य यांच्या नात्याचा. या सिनेमाचं नाव आहे एक सांगायचंय. गंमत अशी की यामध्ये मुख्य भूमिकेसाठी कलाकार निवडताना त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत नवारूपाला आलेल्या के के मेनन यांना निवडलं. केके यांनी केेलेल्या भूमिका पाहता त्यांची निवड चोख आहे. हजारो ख्वाहिशे एेसी, लाईफ इन मेट्रो, गाझी अॅटॅक, हानीमून प्रा.लि, सरकार अशा अनेक चित्रपटातून ते लोकांसमोर आले आहे. केकेसारखा नट जेव्हा ही संहिता निवडतो तेव्हा या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढते. शिवाय, लोकेश गुप्ते यांनीच या चित्रपटाचं लेखन, संकलन, दिग्दर्शन केल्यामुळे या उत्सुकतेत भरच पडते.
एक सांगायचंय.. हे नाव कोड्यात टाकणारं आहे. अनेक प्रश्न हे टायटल निर्माण करतं. हे सांगणं कुणाचं कुणाला आहे? पालकांचं मुलांना.. मुलांचं पालकांना.. दिग्दर्शकाचं प्रेक्षकांना? की आणखी काही कोण कुणाला सांगतं आहे.. तर हा विषय पाहता पालकांच्या अपेक्षांचं नकळतं ओझं जे मुलांच्या खांद्यावर पडतं.. त्या ओझ्याबद्दलचं हे सांगणं आहे. कुणी कुणावर मुद्दाम ओझं टाकत नाही. पालक-मुलांच्या वाढत्या वयामुसार या गोष्टी होत जातात. पण त्या गोष्टींकडे मुद्दाम लक्ष देण्याची गरज हा चित्रपट अधोरेखित करतो.
सिनेमात चार मित्रांचं टोळकं आहे. कबीर, अनाहिता, ध्रुव आणि अंगद अशी त्यांची नावं. चारही मुलांची आर्थिक कुवत वेगवेगळी. त्यातली अनाहिताही बड्या बापाची मुलगी. धनाढ्य म्हणता येईल अशी. पण ही गोष्ट कबीरची आहे. चारही मुलं घट्ट मित्र असली तरी प्रत्येकाची आपली स्टोरी आहे. चैन करणे.. गावभर मजा मारत फिरणे अशी ही स्वैर टोळी एके दिवशी पार्टी करण्यासाठी एकेठिकाणी जाते आणि तिथे पोलिसांचा छापा पडतो. त्यानंतर मात्र या संपूर्ण गोष्टीला वेगळं वळण मिळतं. कारण ही धाड टाकणारा पोलीस अधिकारी असतो मल्हार रावराणे अर्थात कबीरचा बाप. त्यानंतर या घटनेमुळे कबीर आणि त्याच्या कुटुंबात कसे तणाव निर्माण होता.. बाप-लेकाचं नातं कसं एका टोकावर जाऊन उभं राहतं आणि त्यातून पुढे कशा घटना घडत जातात हे या गोष्टी सांगितलं आहे आणि त्यातून दिग्दर्शकाने पालक मुलांच्या संवादाच्या गरजेला अधोरेखित केलं आहे.
चित्रपटाचा विषय आणि त्याच्या हेतूबद्दल काहीच शंका घ्यायचं कारण नाही. अत्यंत प्रामाणिकपणे चांगला चित्रपट द्यायचा प्रयत्न लोकेशने केला आहे. गोष्टही त्याला पोषक आहे. पण त्याची पटकथा होताना मात्र याचा उत्तरार्ध आणखी गतीमान आणि तुलनेनं वेगवेगळे पैलू मांडणारा असायला हवा होता असं वाटत जातं. म्हणजे, चारही मुलाची आपली अशी गोष्ट.. पण त्या गोष्टीतही तोचतोचपणा येतो. चारही मुलांना आपल्या पालकांबद्दल काही तक्रारी आहेत. चारही मुलांचे पालक ग्रे शेडमध्ये जातायत की काय अशी शक्यता वाटत रहाते. शिवाय, दिग्दर्शकाचं म्हणणं कळत जरी असलं, तरी त्याचं रिपिटेशन उत्तरार्धात खूप झालं आहे. त्यानंतरही पुन्हा शेवटी मल्हार रावराणेच्या तोंडी ते डोस घातल्यामुळे हा सगळा प्रकार काहीसा कंटाळवाणा होतो. तो जर वेगवान झाला असता तर चित्रपट आणखी वेधक झाला असता.
सिनेमातली गाणी चांगली झाली आहेत. मैत्रीचं गाणं. रे बाबा.. हे गाणं मनाचा ठाव घेतं. संकलन नेटकं. अभिनयाबाबात चित्रपटाच्या पूर्वार्धात केके मेनन यांना घेण्याचं कारण कळत नाही. पण एका घटनेमुळे बापाचं विस्कटून जाणं केके यांनी ठाशीव दाखवलं आहे. त्याचे अनेक पैलू त्यांनी नेमके उलगडले आहे. राजश्री सचदेव यांनी केके यांना संयमी साथ दिली आहे. पण आई म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका मात्र अचंबित करणारी आहे. बाकी इतर कलाकार ठिक.
पटकथेच्या प्रसंगातला तोचतो पणा टाळता आला असता आणि उत्तरार्ध काहीसा वेगवान करता आला असता तर चित्रपट आणखी छान झाला असता असं वाटत राहतं. अर्थात लोकेश यांचा हा पहिला प्रयत्न आहे. या सिनेमातून त्यांना खूप काही शिकायला मिळालं असेल यात शंका नाही. त्यामुळे त्यांच्या नव्या सिनेमाकडून नक्कीच अपेक्षा आहेत. पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला आपण देतो आहोत, तीन स्टार्स.