समीर विद्वांस या दिग्दर्शकाने आपला असा स्वतंत्र प्रेक्षक वर्ग बनवला आहे. सातत्याने उत्तम चित्रपट निर्मिती करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आता तो आपल्यासमोर आनंदी गोपाळ जोशी यांच्यावर बेतलेला आनंदी गोपाळ हा चित्रपट घेऊन आला आहे. वास्तविक पाहता आनंदीबाई यांचं आयुष्य होतं ते अवघं 22 वर्षांचं. त्यात त्यांनी जिद्दीने डॉक्टरकी मिळवली. त्यांच्या या संघर्षाची भुरळ दिगदर्शकाला पडली.
सिनेमाची गोष्ट सरळ आहे . पण वाटते तितकी सोपी नसणारी. पुण्याच्या यमुनाबाईंचं लग्न होतं गोपाळरावांशी. त्यावेळी त्यांचं वय असत अवघ 9 ते 10. गोपाळरावांच्या आग्रही भूमिकेने त्या शिकू लागतात आणि काही प्रसंग असे त्यांच्या आयुष्यात येतात की त्या डॉक्टर व्हायचं ठरवतात. त्याचा हा प्रवास. हा प्रवास पुणे, ठाणे, अलिबाग, कोलकाता करत पोचतो अमेरिकेत. काळ अर्थातच 1880 च्या आसपासचा.
लेखन, पटकथा लेखन, संवाद आदी पटलांवर चित्रपट चोख उतरला आहे. नेटकी वेशभूषा, कलादिग्दर्शन, छायालेखन यांचा मोठा फायदा चित्रपटाला झाला आहे. आणि त्याला जोड मिळाली आज ती अभिनयाची. ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद, गीतांजली कुलकर्णी, योगेश सोमण, क्षिती जोग सर्वांच्या भूमिका चोख. विशेष कौतुक ललित आणि भाग्यश्रीचं. गोपाळरावांच काळापुढे चालणं.. त्यांचा तापटपणा संवेदनशील स्वभाव ललितने उत्तम साकारला आहे. यात प्रभाव पडतो तो गोपाळरावांच्या शिट्टीचा सीन. आनंदी झालेल्या भाग्यश्रीनेही अल्लड असणारी आनंदी आणि अनुभवातून खंबीर बनलेल्या आनंदीबाई हा प्रवास छान उभा केला आहे.
या चित्रपटावर नाटकाची छाप जाणवते. त्यामुळे थेट खटकत काही नाही पण नाटकाची आठवण होते. एकूणच चित्रपट छान जमला आहे. पण तो शेवटचा प्रसंग वगळता सिनेमा आणखी भारून टाकणारा हवा होता असे वाटते.
म्हणूनच पिक्चर बिक्चर मध्ये आपण याला देतो आहोत साडेतीन स्टार्स. सिनेमाची गाणी हिट आहेतच. ती पाहताना आणखी मजा येईल यात शंका नाही.