Renuka Shahane Actress Post Goes Viral : मागील काही दिवसांमध्ये मुंबईत मराठी माणसांसोबत दुजाभाव होत असल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर मराठी मनात संतापाची लाट उसळली. एका कंपनीने  मुंबईत नोकरी असूनही मराठी उमेदवारांना अर्ज करण्यास परवानगी नाही असेही सांगितले. मुंबईसह राज्यात संबंधितांविरोधात संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्यात आली. आता या सगळ्या प्रकरणावर आता अभिनेत्री रेणुका शहाणेची (Renuka Shahane) पोस्ट चर्चेत आली आहे. 


अभिनेत्री रेणुका शहाणेने ट्विटरवर मराठी माणसांसोबत झालेल्या दुजाभावावर संताप व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना रेणुका शहाणेने मराठी माणसांसोबत दुजाभाव करणाऱ्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. 


रेणुका शहाणे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, मराठी "Not Welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका, असे आवाहनही रेणुका शहाणेने केले. 


 






मी कोणाच्या विरोधात नाही, पण...


अभिनेत्री रेणुका शहाणेने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, मी कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध  नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे असे रेणुकाने म्हटले. 


युजर्सने काय म्हटले?


अभिनेत्री रेणुका शहाणेच्या पोस्टवर युजर्सने भरभरून कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी रेणुका शहाणेंनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे.  एका युजरने मराठी भाषा मराठी संस्कृती व आपली मुंबई वाचवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आभार असे म्हटले आहे. तर, एका युजरने तुम्ही आमचे मन जिंकले असल्याचे सांगत तुम्ही तुमच्या पाठिचा कणा ताठ असल्याचे दाखवून दिले असल्याची प्रतिक्रिया दिली. तर, रेणुकाच्या या पोस्टलाही काहींनी विरोध केला आहे. आशुतोष राणा आणि तुम्ही मराठीत किती काम करता हे सांगाल का? असा प्रश्न एकाने केला आहे. तर, काही युजर्सचा रोख हा भाजपविरोधात भूमिका का घेतली, त्या संबंधित कंपनीविरोधात का नाही असे विचारले.