पुणे : अस्तु, दहावी फ, नितळ, संहिता, दोघी, वेलकम होम, एक कप च्या असे अत्यंत तरल आणि पठडीबाहेरचे विषय अत्यंत सोप्या, सहज पद्धतीने चित्रपटात मांडणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं पुण्यात निधन झालं. त्या 78 वर्षांच्या होत्या. गेल्या अडीच महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयात त्यांनी सोमवारी (19 एप्रिल) सकाळी सव्वासात वाजता अखेरचा श्वास घेतला. 


सुमित्रा भावे यांनी 1980 च्या दशकापासून चित्रपट या माध्यमाला आपलंस करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी काही लघुपट बनवले. त्यांनतर त्यांनी चित्रपट बनवण्यास सुरुवात केली. त्यासाठी सुनील सुकथनकर यांची त्यांना मोलाची साथ लाभली. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या दोघांनी मिळून जवळपास 17 अत्यंत महत्वाचे चित्रपट दिले. पैकी दहावी फ, दोघी, अस्तु, नितळ, कासव आदी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. त्यांनी दिग्दर्शिक केलेल्या 'कासव' या चित्रपटाने 2017 मध्ये सुवर्ण कमळही मिळवलं. 


सुमित्रा भावे या केवळ दिग्दर्शिका नव्हत्या. तर त्यांचं लेखनही तितकंच महत्वाचं होतं. कथा, पटकथा, गीतलेखन आदी विभागात त्यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे. जगण्याजवळ जाणारे विषय अत्यंत सूक्ष्म पद्धतीने मांडताना त्याची मांडणी त्यांनी कधीच बोजड वा अवघड होऊ दिली आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटातून त्यांनी महत्त्वाचे विषय तितक्याच हळूवारपणे मांडले. 'अस्तु' या चित्रपटात त्यांनी अल्झायमर झालेल्या व्यक्तीची मानसिकता मांडली. तर 'दहावी फ'सारख्या चित्रपटातून त्यांनी मुलं आणि शिक्षक यांच्या नातेसंबंधाना अधोरेखित केलं होतं. ते करताना मुलांच्या मानसिकतेचा उभा छेद त्यांनी आपल्या चित्रपटातून मांडला होता. चित्रपट हे माध्यम सर्जनशील आहेच. कलात्मक आहे. पण त्यासाठी प्रचंड शारीरिक, मानसिक कष्ट लागतात. मोठी आर्थिक उलाढाल असते. तरीही चित्रपट हे शिक्षणाचं, परिवर्तनाचं महत्त्वाचं माध्यम आहे असं त्या आवर्जून नमूद करत. 


सुमित्रा भावे यांच्या फुप्फुसात गेल्या काही महिन्यांपासून संसर्ग झाला होता. त्यासाठीचे उपचारही त्या घेत होत्या. दरम्यान त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. पण ती निगेटिव्ह आली होती. फुप्फुसाच्या संसर्गाचे उपचार चालू असतानाच गेल्या 15 दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. अखेर सोमवारी सकाळी सव्वासात वाजता त्यांचं निधन झालं.