मुंबई : प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नृत्यदिग्दर्शक अहमद खान यांनी एबीपी न्यूजच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


अहमद खान यांचा वृत्ताला दुजोरा


बॉलिवूडचे आणखी एक नृत्यदिग्दर्शक आणि रेमोचे सिनिअर अहमद खान यांनी एबीपी न्यूजच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रेमोने स्वत: अहमद यांच्या बरोबर 6 वर्षे काम केले आहे. त्याने अहमद खानला बर्‍याच चित्रपटात मदत केली. रेमो आणि अहमद दोघेही एकमेकांच्या अगदी जवळचे आहेत. रेमोची पत्नी लिज डिसूझाही रूग्णालयात हजर आहे. रेमोची अँजियोग्राफी झाली असून तो आयसीयूमध्ये दाखल आहे.


रेमो डिसूझा कोण आहे?


रेमो डिसूझा हा बॉलिवूडमधील दिग्गज कोरिओग्राफर आहे. त्याने आतापर्यंत अनेक बड्या चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केलं आहे. 1995 मध्ये बॉलिवूडमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली, त्यानंतर त्यांनी 2000 मध्ये दिल पे मत ले यार या चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केले. त्यानंतर त्यांनी आत्तापर्यंतच्या अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये नृत्य कोरिओग्राफ केले आहे. त्याला तहजीब, स्टुडंट ऑफ द इयर, ये जवानी है दिवानी, एबीसीडी 2, बाजीराव मस्तानी आणि कलंक या चित्रपटांसाठी गौरविण्यात आले आहे.


चित्रपट दिग्दर्शनातही पाऊल
कोरिओग्राफीबरोबरच रेमोने गेल्या काही वर्षांपासून चित्रपट दिग्दर्शनातही पाऊल ठेवले आहे. फ्लाइंग जूट, रेस 3, सरप्लस, एबीसीडी, एबीसीडी 2 आणि स्ट्रीट डान्सर सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने केले आहे. याशिवाय तो अनेक रियलिटी शोजमध्येही दिसला आहे. त्याने डान्स इंडिया डान्सच्या बर्‍याच सीझनमध्ये परीक्षक म्हणून काम केलं आहे. यापूर्वीच त्याने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले होते. परंतु, या शोच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचला. डान्स इंडिया डान्स व्यतिरिक्त तो झलक दिखला जा, नच बलिये आणि डान्स प्लस सारख्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसला आहे.