Dhoop Paani Bahne De Song Out : गायक केके (KK) यांची अनेक गाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच केके यांचं शेवटचं गाणं 'धूप पानी बहने दे' (Dhoop Paani Bahne De) हे नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'धूप पानी बहने दे' हे गाणं ऐकून चाहते भावूक झाले आहेत.
'धूप पानी बहने दे' ऐकून चाहते झाले भावूक
केके यांनी 'शेरदिल द पीलीभात सागा' या सिनेमासाठी शेवटचं गाणं गायलं होतं. 'धूप पानी बहने दे' असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले आहेत. तर शांतनु मोइत्रा यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. 'धूप पानी बहने दे' हे गाणं ऐकून चाहत्यांनी केकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
'शेरदिल द पीलीभात सागा' सिनेमाची केकेच्या चाहत्यांना उत्सुकता
'शेरदिल द पीलीभात सागा' या सिनेमात पंकज त्रिपाठी, नीरब काबी आणि सयानी गुप्ता मुख्य भूमिकेत आहेत. श्रीजीत मुखर्जी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा 24 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता 'धूप पानी बहने दे' हे गाणं हे गाणं ऐकल्यानंतर केके यांचे चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
केके बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक होते. बॉलिवूडमधील 200 हून अधिक सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहेत. 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमातील 'तडप तडप के इस दिल से' हे त्यांचं गाणं लोकप्रिय झालं होतं. 'खुदा जाने' सारखे रोमँटिक गाणे, 'इट्स द टाइम टू डिस्को' आणि 'कोई कहे कहता रहे' सारखे डान्स नंबर्स तसेच 'तडप तडप के इस दिल से' सारखे सॅड सॉन्गस आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.
केके यांनी हिंदीसोबतच नऊ भाषांमधील गाणी रेकॉर्ड केली आहेत. हिंदी आणि मराठीबरोबरच तमिळ, तेलगू, मल्याळम, ओरिया आणि आसामी या भाषांमधील गाणी देखील केके यांनी गायली आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये केकेनं 200 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. फिल्मफेअरनेदेखील केके यांना गौरविण्यात आलं आहे.