पुन्हा प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली'कडे प्रेक्षकांची सपशेल पाठ
एबीपी माझा वेब टीम | 10 Apr 2017 03:33 PM (IST)
मुंबई : येत्या 28 एप्रिलला 'बाहुबली 2' म्हणजेच 'बाहुबली : द कन्क्ल्युजन' हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर बाहुबलीचा पहिला भाग पुनर्प्रदर्शित करण्याचा घाट निर्मात्यांनी घातला, मात्र प्रेक्षकांनी याकडे सपशेल पाठ फिरवली आहे. 'बाहुबली : द बिगिनिंग'च्या री-रिलिजला पहिल्या तीन दिवसात अवघ्या दोन कोटींचा गल्ला जमवता आला. 'डीएनए' वृत्तपत्राच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 'बाहुबली : द बिगिनिंग' 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झाला होता. 'बाहुबली : द बिगिनिंग' हा पहिला भाग दोन वर्षांच्या कालावधीने 7 एप्रिल 2017 ला पुन्हा रिलीज करण्यात आला. 'कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?' या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या भागात मिळणार आहे. मात्र त्यासाठी आतुर झालेल्या प्रेक्षकांना पुन्हा पहिला भाग पाहण्याची इच्छा नसावी. बाहुबलीचा दुसरा भाग प्रदर्शित होण्यास तब्बल दोन वर्षांचा कालावधी लागला. त्यामुळे पहिला भाग हा एक प्रकारचा रिफ्रेशर ठरणार होता. मात्र बाहुबलीच्या पहिल्या भागाची पारायणं केलेल्या प्रेक्षकांना तो पुन्हा एकदा थिएटर पाहण्याची इच्छा नाही.