Rashmika Mandanna Birthday : 'नॅशनल क्रश ऑफ इंडिया' म्हणून लोकप्रिय असलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा (Rashmika Mandanna) आज वाढदिवस आहे. रश्मिकाने सौंदर्यासह अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीतही रश्मिकाची क्रेझ आहे. 


रश्मिकाचा जन्म 5 एप्रिल 1996 रोजी कर्नाटकातील विराजपेटमध्ये झाला आहे. आई-वडिलांची लाडकी लेक असलेल्या रश्मिकाला लहानपणापासून अभिनयाची गोडी लागली होती. आज रश्मिका नॅशनल क्रश आणि उत्कृष्ट अभिनेत्री असली तरी त्यावेळी तिने पकधीही अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला नाही. 


'श्रीवल्ली'च्या शिक्षणाबद्दल जाणून घ्या...


शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रश्मिकाने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. मालिकांमध्ये काम करत असतानाच तिने रमैया कॉलेज ऑफ आर्ट्स अॅन्ड कॉमर्स या महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. मानसशास्त्र, इंग्रजी लिटरेचर आणि पत्रकारिता या विषयात रश्मिकाने पदवी संपादन केली आहे.


रश्मिकाचा सिनेप्रवास...


महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होत असतानाच रश्मिकाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. राष्ट्रीय पातळीवरील एका नाट्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावल्यानंतर रश्मिकाचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला होता. त्यानंतर कन्नड सिने-निर्माते मनमोहक मुस्कान यांनी आपल्या आगामी सिनेमासाठी रश्मिकाला विचारणा केली आणि अशाप्रकारे रश्मिकाचा सिनेप्रवास सुरू झाला. 


'किरिक पार्टी' या सिनेमाच्या माध्यमातून रश्मिकाने 2016 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर अनेक एकापेक्षा एक सिनेमात तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. पण 2021 साली आलेल्या 'पुष्पा' या सिनेमाने रश्मिकाला खऱ्या अर्थाने जगभरात लोकप्रियता मिळाली. पुष्पाची श्रीवल्ली प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर 'गुडबाय' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता रश्मिकाचा 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. संदीप रेड्डी वांगा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. तर तिच्या आगामी 'पुष्पा 2' या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


कोट्यवधींची मालकीण रश्मिका मंदान्ना!


रश्मिका मंदान्ना आज कोट्यवधींची मालकीण आहे. तिची एकूण संपत्ती 45 कोटींपेक्षा अधिक आहे. तसेच दर महिन्याला ती 40 लाख रुपये कमावते. तिची वर्षभराची कमाई पाच कोटींच्या आसपास आहे. एका सिनेमासाठी ती चार कोटी मानधन घेते. रश्मिकाचं स्वत:चं आलिशान घर आहे. तसेच तिच्याकडे अनेक महागड्या गाड्यादेखील आहेत.


संबंधित बातम्या


Rashmika Mandanna : रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाचा ब्रेकअप? आता 'या' अभिनेत्याला डेट करतेय अभिनेत्री