अभिनेता प्रतिक बब्बरविरोधात गोव्यात गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम | 11 Oct 2018 08:10 AM (IST)
रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी प्रतिक बब्बरवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रतिकची अपघातास कारणीभूत असलेली कार पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास सुरु आहे.
पणजी: बॉलिवूड अभिनेता प्रतिक बब्बरविरोधात गोव्यात काल रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी प्रतिक बब्बरवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रतिकची अपघातास कारणीभूत असलेली कार पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास सुरु आहे. प्रतिक बब्बर हा आपल्या कारने जात असताना उत्तर गोव्यातील पणजी-म्हापसा महामार्गावर एका स्थानिक युवकाच्या दुचाकीशी धडक झाली. त्या युवकाने तक्रार दाखल केल्यानंतर प्रतिकविरोधात पर्वरी पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रतिक बब्बरने धमकावल्याचा आरोपही या युवकाने केला आहे. पॉलो कोरिआ या तरुणाने प्रतिक बब्बरविरोधात तक्रार दिली आहे. प्रतिक स्वत: ड्रायव्हिंग करत असलेल्या कारने आपल्या स्कूटरला धडक दिली, असा आरोप पॉलोने केला आहे. स्कूटरवर मी आणि माझी बहिण होतो, असं पॉलोने म्हटलंय. या अपघातानंतर प्रतिक बब्बरने शिवीगाळ केल्याचा दावा पॉलोने केला आहे. दुसरीकडे पॉलोने आपल्या कारची काच फोडल्याचा आरोप प्रतिक बब्बरने केला आहे. त्यासाठीच त्याने पॉलोविरोधात तक्रार दिली. रात्री उशिरा जेव्हा प्रतिकला म्हापसा येथील आझीलो हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता, त्याने आपला रक्तनमुना तपासणीसाठी देण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान आम्ही अपघातग्रस्त कार जप्त केली आहे, असं पोलीस निरीक्षक नाईक यांनी सांगितलं. सध्या मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे, असं पोलिसांनी सांगितलं.