आतापर्यंत कधीही न पाहिलेला रणवीर, 'पद्मावती'चा फर्स्ट लूक रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2017 08:34 AM (IST)
पद्मावती सिनेमात अल्ला उद्दीन खिलजीची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंहचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. रणवीरने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमात अल्ला उद्दीन खिलजीची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंहचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. रणवीरने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. रणवीर यामध्ये आतापर्यंत कधीही न पाहिलेल्या लूकमध्ये दिसत आहे. रणवीरच्या या लूकची सर्वत्र चर्चा आहे. यापूर्वी सिनेमात भूमिका साकारणाऱ्या शाहिद कपूर आणि दीपिका पदुकोनचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. नवरात्राचा मुहूर्त साधत गुरुवारी सुर्योदयाच्या वेळी दीपिकाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. रणवीर, शाहीद, दीपिका आणि भन्साळी यांनी आधीपासूनच इन्स्टाग्रामवर त्याबाबत माहिती दिली होती. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. विशेष म्हणजे पद्मावती चित्रपट एप्रिल महिन्यात रिलीज होणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु चाहत्यांना आनंदाचा धक्का देत यावर्षीच हा सिनेमा प्रदर्शित करण्याचं भन्साळींनी जाहीर केलं आहे. एक डिसेंबर 2017 रोजी पद्मावती सिनेमागृहांमध्ये झळकेल.
पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे. दिल्लीचा शक्तिशाली सुलतान असलेल्या अल्लाउद्दिन खिल्जीचा जीव राणी पद्मावतीवर जडला होता. या प्रेमातूनच त्याने तिच्या राज्यावर हल्लाबोल केला होता. मात्र त्याला शरण जाण्याऐवजी पद्मावतीने देहत्याग करणं पसंत केलं.