रायपूर : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा पुत्र आणि प्रसिद्ध टीव्ही अँकर आदित्य नारायणने रायपूर विमानतळावर राडा घातल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्याने इंडिगो एअरलाईनच्या अधिकाऱ्याला धमकावल्याचं दिसत आहे.


आधिक माहितीनुसार, दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी आदित्य रायपूरला आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर तो रायपूर ते मुंबई इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणार होता. पण यावेळी त्याच्या सोबत जे सामान होतं, त्याचं 17 किलो पेक्षा जास्त होतं.

वास्तविक, विमानातून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला 15 किलोपर्यंत सामान घेऊन प्रवास करण्यास परवानगी आहे. पण या मर्यादेपेक्षा जास्त सामान आदित्यकडे असल्याने विमान अधिकाऱ्यांनी त्याला अडवलं.

यानंतर, त्याने विमान अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच, "तू कधी ना कधी मुंबईत येशील, तेव्हा तुला माझा हिसका दाखवेन," अशी धमकी दिली. यानंतर दुसऱ्या एका अधिकाऱ्याने मध्यस्ती करत, आदित्यला शांत केलं.

पण तरीही आदित्याला राग अनावर झाला होता. त्याचं इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्याला धमकावणं सुरुच होतं. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहा