बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशीही 'सिम्बा'ची मोठी झेप
एबीपी माझा वेब टीम | 30 Dec 2018 08:43 PM (IST)
पहिल्या दोन दिवसांचा गल्ला धरुन सिम्बाच्या खात्यात 44.05 कोटी रुपये जमा झाले आहेत. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी 13 टक्क्यांची वाढ झाली.
NEXT PREV
मुंबई : रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या 'सिम्बा' चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर आपली घोडदौड कायम ठेवली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सिम्बाने 23.33 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. दोन दिवसात सिनेमाच्या बजेटच्या अर्धी रक्कम वसूल करण्यात निर्मात्यांना यश आलं आहे. 28 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या सिम्बाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 20.72 कोटी रुपयांची कमाई केली होती. सिम्बा हा रणवीरची भूमिका असलेला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा ठरला आहे. पहिल्या दोन दिवसांचा गल्ला धरुन सिम्बाच्या खात्यात 44.05 कोटी रुपये जमा झाले आहेत. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी 13 टक्क्यांची वाढ झाली. माऊथ पब्लिसिटी, अनुकूल रिव्ह्यू आणि नाताळच्या सुट्ट्या पाहता पहिल्या चार दिवसांतच सिम्बा शंभर कोटी रुपयांच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. पहिल्या वीकेंडला जोडून सोमवारी 31 डिसेंबर आल्यामुळे सिम्बा चांगली कामगिरी करण्याची आशा व्यक्त होत आहे. 80 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा सिनेमा जगभरात चार हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला.