मुंबई : 'पद्मावत' सिनेमानंतर अभिनेता रणवीर सिंह लवकरच नव्या सिनेमात दिसणार आहे. पण हा चित्रपट बॉलिवूडचा नाही तर पाकिस्तानचा आहे. रणवीर सिंहने पाकिस्तानी चित्रपट 'तीफा इन ट्रबल' नावाच्या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची पाकिस्तानात जोरदार चर्चा सुरु आहे.

'तीफा इन ट्रबल' चित्रपटात अभिनेता अली जाफरची प्रमुख भूमिका आहे. तर या सिनेमात रणवीर सिंह कॅमियो करणार आहे. हा सिनेमा पाकिस्तानच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अली जाफर आणि रणवीर सिंह दुसऱ्यांदा मोठ्या पडदद्यावर एकत्र काम करत आहेत. याआधी दोघांनी 'किल-दिल' सिनेमात एकत्र काम केलं होतं.

अली जाफरने या चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल ट्विटरवर माहिती दिली आहे. "तीन दिवसात सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई करत 7.20 कोटी कमावले आहेत," असं त्याने सांगितलं. "हा चित्रपट अद्याप भारतात प्रदर्शित झालेला नाही. लवकरच भारतातही तो प्रदर्शित होण्याची आशा आहे," असं अली जाफर म्हणाला.


हे भारतीय कलाकार पाकिस्तानी चित्रपटात
पाकिस्तानी सिनेमात सर्वात आधी 1959 रोजी भारताच्या शेहला रेहमानी यांनी काम केलं होतं. 'अनोखी' नावाच्या चित्रपटात त्या झळकल्या होत्या. यानंतर नासिरुद्दीन शाह, किरण खेर, अरबाज खान, नेहा धुपिया, जॉनी लिव्हर, गोविंद नामदेव या कलाकारांनी पाकिस्तानी चित्रपटात काम केलं आहे.