मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा सध्या लाखो तरुणींच्या हृदयाची धडकन आहे. मात्र रणवीरने प्रयोगशीलता सोडलेली नाही. आगामी 'पद्मावती' चित्रपटात तो बायसेक्शुअल व्यक्तिरेखा साकारणार असल्याचं वृत्त आहे. अभिनेता जिम सर्भ रणवीरच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसण्याची चिन्हं आहेत.


पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. दिल्लीचा शक्तिशाली सुलतान असलेला खिल्जी हा बायसेक्शुअल असल्याचं इतिहासाच्या पुस्तकात म्हटलं आहे. राणी पद्मावतीवर अल्लाउद्दिन खिल्जीचा जीव जडला होता. या प्रेमातूनच त्याने राज्यावर हल्लाबोल केला होता. मात्र त्याला शरण जाण्याऐवजी पद्मावतीने देहत्याग करणं पसंत केलं.

त्याचवेळी खिल्जीचं मुख्य सल्लागार असलेल्या मलिक काफूरवरही प्रेम होतं. गुजरातहून हजारो सुवर्णमुद्रा देऊन खिल्जीने एका तरुणाला विकत घेतलं. हाच तरुण भविष्यात मदुराईवर हल्ला करणारा सेनापती झाला, असं देवदत्त पटनाईकांनी लिहिल्याचं म्हटलं आहे.

आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?

भन्साळींनी इतिहासातली ही बाजू मोठ्या पडद्यावर दाखवल्यास ही अनोखी प्रेमकथा पाहायला मिळेल. काफूरची व्यक्तिरेखा अभिनेता जिम सर्भ साकारणार आहे. जिमने 'राबता'मध्ये खलनायकाची भूमिका केली होती, तर 'नीरजा'मध्ये तो हायजॅकर झाला होता.

खिल्जी आणि कफूर यांची प्रेमकहाणी वाचून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी प्रचंड प्रभावित झाले. त्यामुळेच मुख्य कथेसोबत ही लव्हस्टोरीही मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र कोणाच्याही भावना न दुखावता खिल्जीच्या मनातला हा हळवा कोपरा भन्साळी चितारणार आहेत. भन्साळींनी अद्याप याला दुजोरा दिला नसला तरी अनेक ऑनलाईन पोर्टलवर याबाबत वृत्त देण्यात आलं आहे.

....म्हणून रणवीर-दीपिका-शाहिदचा 'पद्मावती' पुढील वर्षी प्रदर्शित होणार

दीपिका पदुकोण पद्मावतीची व्यक्तिरेखा साकारत असून शाहिद कपूर राजा रतन सिंहच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. गोलियोंकी रासलीला- रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.

पद्मावती सिनेमासाठी दीपिकाला सुमारे 13 कोटी रुपये मिळाले आहेत. तर रणवीर सिंह आणि शाहिद कपूरने प्रत्येकी 10  कोटी रुपये घेतले आहेत. हे वृत्त खरं असल्यास, बॉलिवूडमधील चर्चित मानधनातील तफावतीच्या मुद्द्यासंदर्भात दीपिकाने नवा ट्रेण्ड सेट केला आहे.

चित्रपटाचं 95 टक्के चित्रीकरण पूर्ण झालं आहे. हा सिनेमा 17 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता पुढील वर्षी एप्रिलमध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

सिनेमाचं बजेट 150 कोटी रुपयांचं असल्याने निर्माते प्रत्येक बाजूने रिकव्हरीबाबत विचार करत आहेत. चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्येही जास्त वेळ लागणार आहे. युद्धाची अनेक दृश्यं आहेत, ज्यात व्हीएफएक्सचा वापर होणार आहे.

महाराणी पद्मावतीवर आधारित या सिनेमाची कथा आहे. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. राणी पद्मावती आणि राजामध्ये काही इन्टिमेट सीन्स आहेत, तर राणी आणि खिल्जी यांच्यात एकही रोमँटिक सीन नाही.

भन्साली यांचा हा चित्रपट सुरुवातीपासूनच अनेक अडथळ्यांचा सामना करत आहे. आधी भन्साली निर्मात्यांचा शोध घेत होते. यानंतर जयपूरमध्ये शूटिंगदरम्यान विरोध झाला होता, तर खुद्द भन्सालींना मारहाणही करण्यात आली होती.