'सिंबा'मध्ये रणवीर सिंह संग्राम भालेराव नावाची मराठमोळ्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. सिनेमात त्याच्यासोबत सारा अली खान मुख्य भूमिकेत आहे. या दोघांनीही 3 डिसेंबर रोजी सिंबाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचं इन्स्टाग्रामवर सांगितलं होतं.
'सिंबा'चा ट्रेलर पाहून अजय देवगणच्या सिंघमची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. पोलिसाच्या भूमिकेत रणवीर आणि अजयमध्ये फार साम्य आहे. पण दोघांच्या व्यक्तिरेखा वेगळ्या आहेत. सिंघममध्ये अजय गंभीर आणि प्रामाणिक पोलीस आहे. तर सिंबामध्ये रणवीर मनमौजी आणि भ्रष्टाचारी पोलीस साकारत आहे. परंतु कथानक जसजसं पुढे सरकतं तसं 'सिंबा'च्या व्यक्तिरेखेत गांभीर्य दिसतं.
ट्रेलरमध्ये अॅक्शन आणि संवाद दमदार आहे. यातील अनेक संवाद प्रेक्षकांच्या टाळ्या-शिट्ट्या मिळवू शकतात. शिवाय ट्रेलरच्या अखेरीस अजय देवगणही पाहायला मिळतो.
लग्नानंतरचा रणवीरचा हा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर 2018 मध्ये प्रदर्शित होणारा 'सिंबा' हा रणवीर सिंहचा दुसरा चित्रपट आहे. याआधी तो संजय लीला भन्सालीच्या 'पद्मावत'मध्ये झळकला होता.
सारा अली खान आणि रणवीर सिंह यांचा हा चित्रपट 28 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. साराचा हा कारकीर्दीतला दुसरा सिनेमा आहे. ती 'केदारनाथ'मध्ये सुशांत राजपूतसोबत दिसणार आहे.
पाहा ट्रेलर