रणवीर सिंह 'पद्मावती'च्या सेटवर जखमी
एबीपी माझा वेब टीम | 27 May 2017 06:15 PM (IST)
मुंबई : बॉलिवूड सपरस्टार रणवीर सिंह पद्मावती सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाला आहे. मात्र आता त्याची प्रकृती ठिक असून तो पुन्हा 'पद्मावती'च्या चित्रीकरणात सहभागी झाला असल्याची माहिती आहे. संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावती सिनेमात रणवीर अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारत आहे. सिनेमाचं शूटिंग सुरू असताना रणवीरच्या डोक्याला जखम झाली. मात्र तो शूटिंगमध्ये इतका मग्न होता की त्याला जखम झाल्याचं कळलंदेखील नाही. मात्र डोक्याला झालेल्या जखमेतून रक्त वाहू लागल्याने रणवीरला जखम झाल्याचं समजलं आणि त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान यापूर्वीही संजय लीला भंसाळी यांच्या ऐतिहासिक व्यक्तीरेखेवर आधारित 'बाजीराव मस्तानी'च्या चित्रीकरणावेळी रणवीर जखमी झाला होता. यामध्ये रणवीर पेशवा बाजीरावच्या भूमिकेत दिसला होता. 'पद्मावती' हा सिनेमाही ऐतिहासिक कथेवर आधारित आहे. या सिनेमाच्या कथेवरुन अनेकदा वाद होऊन चित्रीकरण रोखण्याच्या घटनाही घडल्या आहेत.रणवीरशिवाय या सिनेमात शाहीद कपूर आणि दीपिका पादुकोण हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.