मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणवीर कपूर आई-वडिलांपेक्षा मला जास्त घाबरतो, अशी माहिती त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोनने दिली आहे. महिन्यापूर्वीच रणवीर-दीपिकाने लगीन गाठ बांधली आहे. लग्नानंतर दीपिकाने फिल्मफेअर मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रणवीरसोबतच्या नातेसंबंधांबद्दल भाष्य केले.
रणवीरच्या आईने तुला काही टिप्स दिल्या का? असा प्रश्न दीपिकाला मुलाखतीत विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना दीपिका म्हणाली की, " काही खास टिप्स दिल्या नाहीत. मात्र इतकं सांगू शकते की, रणवीर त्याचे आई-वडील, बहीण यांच्यापेक्षा मला जास्त घाबरतो किंवा तो मला तसं भासवण्याचा प्रयत्न करत असेल.
मात्र मी रणवीरच्या वागण्यावर विश्वास ठेवते. मला वाटतं काही काम असेल तर त्याने येऊन मला सांगावं, असं दीपिका म्हणाली. याशिवाय दीपिकाने सासू अंजू भवनानी आणि रणवीरची बहीण रितिका भवनानी यांच्यासोबतच्या नात्यांवरही भाष्य केलं.
लग्नानंतर दीपिका आगामी चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 'छपाक' हा दीपिकाचा आगामी चित्रपट असणार आहे. तसेच विशाल भारद्वाज यांच्या एका सिनेमातही दीपिका झळकणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत इरफान खान मुख्य भूमिकेत असेल. मात्र त्या सिनेमाचं नाव अद्याप ठरलेलं नाही.