दक्षिणेतला स्टार अभिनेता सिद्धार्थ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा नंबर लीक झाला होता. त्यावरून त्याला खूप मेसेज आले, फोन आले. धमक्या आल्या. त्याबद्दल त्याने सोशल मीडियावर भाष्यही केलं होतं. ते करतानाच हा नंबर तामीळनाडू भाजपच्या आयटी सेलकडून लीक झालाय असंही त्यानं नमूद केलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून त्याला आता साऊथची स्वरा असं नामकरण भारतातल्या इतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिलं आहे. सिद्धार्थनेच ही माहीती ट्विटरवर दिली आहे. 


गेल्या काही महिन्यांपासून स्वरा भास्कर सातत्याने भाजपच्या धोरणांबद्दल बोलत असते. केंद्रातून राबवल्या जाणाऱ्या योजना.. त्यांचा कारभार.. कामाची पद्धत यावर स्वरा नेहमी भाष्य करत असते. शेतकरी आंदोलन असो किंवा काश्मीरमध्ये 307 कलम लावण्याची प्रक्रिया असो. स्वराने नेहमीच ट्विटरवरून आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. या भावना व्यक्त करताना स्वरा नेहमी सभ्य भाषा वापरते त्यामुळे कंगनावर जी वेळ आली ती स्वरावर आलेली नाही. पण आता सिद्धार्थच्या भाजपद्रोही भूमिकेमुळे तोही ट्रोल होऊ लागला आहे. इतकंच नव्हे, तर त्याला आता साऊथची स्वरा म्हणून बोललं जाऊ लागलं आहे. 


सिद्धार्थने ट्विटरवरून ही माहीती दिली आहे. मी गेल्या काही काळापासून भाजपच्या इथल्या कार्यकर्त्यांबद्दल नेहमी बोलत असतो. माझा नंबर लीक झाला तेव्हा मी तामीळनाडूच्या भाजपच्या आयटीसेलवर त्याचे आरोप केले होते. त्यामुळे आता ट्विटरवर लोक बोलताना मला साऊथची स्वरा असं म्हणू लागले आहेत. दक्षिण भारत वगळता उत्तर भारतातून मला असे मेसेज येऊ लागले आहेत. सिद्धार्थने हे ट्विट केलंच, पण तो म्हणतो, स्वरा भास्कर ही चांगली अभिनेत्री आहे. त्यानिमित्ताने मला स्वरा संबोधलं जात असेल तर मला काहीच त्यात वावगं वाटत नाही. 


सिद्धार्थच्या या ट्विटची दखल स्वरा भास्करनेही घेतली आहे. सिद्धार्थने आपल्या ट्विटमध्ये स्वराला टॅग केलं होंतं. स्वराने याची दखल घेत, सिद्धार्थला धीर दिला आहे. तू एक उत्तम कलाकार आहेस. आणि तू सिद्धार्थच आहेस. आम्हाला आमच्या या सिद्धार्थवर गर्व आहे अशा आशयाचं हे ट्विट आहे. सिद्धार्थच्या या साऊथ का स्वरा या ट्विटची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. केंद्र सरकारचा द्वेष करण्यात स्वरा भास्कर अव्वल असल्यामुळे ही उपमा त्याला दिली गेली आहे. सिद्धार्थला ही उपमा दिल्यानंतर मात्र तो आणखीच आक्रमक झालेला दिसतो. गेल्या काही दिवसांपासून तो केंद्राच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करतो आहेच शिवाय, इतर राज्यात जे कोणी सरकार योग्य काम करत असेल तर त्यांना पाठिंबा देतानाही दिसतो आहे.