मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि 'क्वीन' अभिनेत्री कंगना रनौत यांच्यातील वाद अद्याप शमलेला नसतानाच कंगनाचं नाव आणखी एका अभिनेत्यासोबत जोडलं जात आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर आणि कंगना रनौतमध्ये प्रेमप्रकरण सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर काही काळ #nowranbirkangana हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेण्डिंगमध्ये होता.
गेल्या काही महिन्यांपासून कंगनाशी रणबीरचं नाव जोडलं गेल्याने खुद्द रणबीरही अवाक झाला आहे. मुळात या कथित अफेअरच्या चर्चा कुठून सुरु झाल्या, हा प्रश्न रणबीरला पडल्याचं त्याच्या जवळच्या सुत्रांनी 'डीएनए' वृत्तपत्राला सांगितलं आहे. मोरोक्कोमध्ये जग्गा जासूस चित्रपटाचं शूटिंग आटोपल्यानंतर रणबीर मुंबईतच आहे.
रणबीरकडून याबाबत कुठलंही स्पष्टीकरण न आल्यामुळे अनेक जण याचा गैरफायदा उचलत अफवा पसरवत आहे. यामुळे रणबीर नाराज झाल्याचंही म्हटलं जातं. रणबीर-कंगना प्रेमप्रकरणाच्या वृत्तात कुठलंही तथ्य नसताना मीडियामध्ये व्यवस्थित या वृत्ताला खतपाणी घातलं जात आहे. मात्र या अफवा पसरवणारं कोण आहे, हे चांगलंच ठाऊक असल्याचा दावा रणबीरने केला आहे.
एकीकडे कंगना आणि हृतिकमधील वाद टोकाला गेला आहे, तर रणबीर आणि कतरिना कैफ यांच्यातील दुरावाही कधी वाढताना तर कधी कमी होताना दिसतो. त्यामुळे ब्रेकअप मधून सावरण्यासाठी दोघांनी एकमेकांना आधार दिला का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.