मुंबई : यंदाच्या ऑस्करमध्ये स्वत: ची वेगळी ओळख निर्माण करणारा हॉलिवूडच्या 'लॉयन द किंग' सिनेमातला बालकलाकार सनी पवार आज मुंबईत परतला आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर तो दाखल झाल्यानंतर त्याचे स्वागत एखाद्या सुपरस्टारप्रमाणे करण्यात आलं. मुंबईच्या एका लहानशा वस्तीत राहणाऱ्या 8 वर्षांच्या सनीला घेण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत झाले होते.



सनी हा मुंबईतल्या कलिना परिसरातील एका लहानशा घरात राहतो. हॉलिवूडच्या 'द लॉयन किंग' या सिनेमातील त्याच्या भूमिकेमुळे आज जगभरातील लोक त्याला ओळखत आहेत. सनीने या सिनेमात देव पटेलच्या बालपणाची व्यक्तीरेखा साकारली आहे.

यंदाच्या ऑस्करसाठी 'लॉयन द किंग' या सिनेमाला नॉमिनेशन मिळाल्यापासून सनी चर्चेत आला. ऑस्कर पुस्कारासाठी तो कॉलिफोर्नियाच्या डॉल्बी हॉलमध्ये दाखल झाला, त्यावेळी त्याने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतलं.



आज तो जेव्हा मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला, तेव्हा त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्याच्या स्वागतासाठी त्याच्या आजी आजोबांसोबत परिसरातील इतर नागरिकांनी फुलं आणि मिठाई आणली होती. माध्यमांशी बोलताना, आपण ऑस्कर पुरस्कार सोहळा एन्जॉय केला असल्याचं त्यांनं यावेळी सांगितलं.

वास्तविक, सनीची आई वसू पवार यांना मुंबईत फिल्म सिटी कुठं आहे, हे माहित नाही. पण आज तिच्या मुलानं जी गरुडझेप घेतलीय ते पाहून तिच्या आईचा आनंद गगनात मावत नव्हता. माध्यमांशी बोलताना सनीचं हे यश व्यक्त करण्यासाठी शब्द सुचत नसल्याचं, सांगितलं. दरम्यान, सनी पवार आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दुपारी 12 वाजता मातोश्री या निवासस्थानी भेट घेणार आहे.