Ramesh Deo : मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचे निधन झाले आहे. रमेश देव यांनी ब्लॅक अॅण्ड व्हाईट ते ओटीटी माध्यमांत काम केले आहे. त्यांच्या पत्नी सीमा देव यादेखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. रमेश देव यांनी साकारलेल्या अनेक भूमिका लोकप्रिय झाल्या आहेत. रमेश देव यांनी अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.
तीन दिवसांपूर्वीच साजरा झाला 93 वा वाढदिवस
रमेश देव यांचा तीन दिवसांपूर्वीच 93 वा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र आज अवघ्या तीन दिवसांत त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
रमेश देव यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 1950 मध्ये केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी 285 हिंदी सिनेमे, 190 मराठी सिनेमे आणि 30 मराठी नाटकांत काम केले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी मालिका, सिनेमांसह 250 हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे. त्यांची अनेक गाणी आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत.
रमेश देव यांचे गाजलेले सिनेमे
'आनंद', 'घराना', 'सोने पे सुहागा', 'गोरा', 'मिस्टर इंडिया', 'कुदरत का कानून', 'दिलजला', 'शेर शिवाजी', 'प्यार किया है प्यार करेंगे'. 'पाटलाचं पोर' सिनेमातून रमेश देव यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. 'आंधळा मागतो एक डोळा' हा देव यांचा पहिला मराठी चित्रपट होता आणि राजश्री प्रॉडक्शनचा 'आरती' हा पहिला हिंदी चित्रपट होता. त्यांची 'आनंद' सिनेमातली भूमिका प्रचंड गाजली.
संबंधित बातम्या