Ram Gopal Varma :   बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma ) यांनी आता राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेशमधील पिठापुरम (Pithapuram ) मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय रामगोपाल वर्मा यांनी जाहीर केला आहे. या मतदारसंघात त्यांचा सामना दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांच्याशी होणार आहे. पवन कल्याण यांचा जनसेना नावाचा पक्ष  आहे. आता रामगोपाल वर्मा यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्याने रंगतदार लढत होईल असे म्हटले जात आहे. 


पवन कल्याण यांना आव्हान


तेलुगू देसम पक्ष (टीडीपी), भाजपा आणि जनसेना पक्ष (जेएसपी) यांच्या युतीने तेलुगू चित्रपट स्टार पवन कल्याण यांना उमेदवारी दिली आहे. पिठापुरम हा विधानसभा मतदारसंघ आहे. ते काकीनाडा लोकसभेत येते. राज्यात सध्या वायएसआर काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. तर, दुसरीकडे मुख्य विरोधी पक्ष तेलगु देसमने पुन्हा एकदा भाजपसोबत युती करत एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. तर, दुसरीकडे रामगोपाल वर्मा यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली. वर्मा यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याची माहिती दिली नाही. मात्र, रामगोपाल वर्मा हे  वायएसआर काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा आहे. 






भाजप-टीडीपी-जनसेना पक्षाची युती


आंध्र प्रदेशात लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका होत आहेत. लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशात भाजप सहा जागांवर, टीडीपी 17 जागांवर आणि जेएसपी दोन जागांवर लढणार आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष 10 जागांवर, टीडीपी 144 जागांवर आणि जेएसपी 21 जागांवर लढणार आहे. राज्यातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने एकट्याने लढण्याची घोषणा केली आहे. आंध्रमध्ये पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी काँग्रेसने वायएस शर्मिला यांच्याकडे सोपवली आहे. शर्मिला या वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या बहीण आहेत.