Rakul Preet Singh's Brother Aman Preet Singh Arrest : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) हिचा भाऊ अमन प्रीत सिंग याला (Aman Preet Singh Arrest) पोलिसांनी अटक केली आहे. अमन प्रीत सिंग याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती आहे. अमनने कोकेनचे सेवन केले असल्याचे वैद्यकीय चाचणीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाशी रकुलचा संबंध नसल्याचेही हैदराबाद पोलिसांनी सांगितले आहे.
रकुल प्रीत सिंगचा भाऊ अमन प्रीत सिंग याच्या ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्याची माहिती खुद्द हैदराबाद पोलिसांनी दिली आहे. हैदराबाद पोलिसांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली होती. यादरम्यान पोलिसांनी सांगितले की, अमन प्रीत सिंग याला अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हैदराबादच्या राजेंद्र नगर एसओटी पोलिस आणि नार्कोटिक्स ब्युरोच्या संयुक्त कारवाईत अमनला इतरांसह अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, अमन याने अंमली पदार्थाचे सेवन केले होते. वैद्यकीय चाचणीत ही बाब समोर आली आहे. त्याशिवाय, आणखी 12 जणांची ड्रग्ज टेस्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अमनने केले कोकेनचे सेवन
अमनने कोकेन सेवन केल्याचे पोलिसांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. कोकेन सेवनासाठी त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. पोलिसांनी सांगितले की, 'प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतरच अमनचा कोणाशी संबंध आहे, हे सांगू शको. काही भारतीय आणि नायजेरियन लोकांचा समावेश असलेल्या आरोपींसोबत त्याचे संबंध कधी सुरू झाले याचा तपास करणे आवश्यक आहे. त्यापैकी काही वारंवार गुन्हे करणारे आरोपी आहेत. कोकेन सेवनासाठी अमनची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
रकुल प्रीत सिंहचा संबंध नाही
ड्रग्ज प्रकरणात कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात रकुलला ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) समन्स बजावल्याबद्दलही पोलिसांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पोलिसांनी 'रकुलचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, आम्ही त्या प्रकरणाचा तपास करत नसून उगाचच त्यांचे नाव या प्रकरणात ओढण्याची आवश्यकता नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
कोकेन, पासपोर्ट जप्त...
अमन प्रीत सिंहच्या प्रकरणात पोलिसांनी 199 ग्रॅम कोकेन, 2 पासपोर्ट, 2 बाइक आणि 10 मोबाईल जप्त केले आहेत. ओनुओहा ब्लेसिंग, अझीझ नोहम अदेशोला, अल्ला सत्या व्यंकट गौतम, सनाबोना वरुण कुमार आणि मोहम्मद महबूब शरीफ या आरोपींना तस्कर म्हणून अटक करण्यात आली आहे, तर डिव्हाईन इबुका सुजी आणि इझोनिली फ्रँकलिन उचेन्ना हे आरोपी फरार आहेत.