पंचकुला (हरियाणा) : पंचकुलात परदेशी कुस्तीपटूने अस्मान दाखवल्यानंतरही अभिनेत्री राखी सावंतची खुमखुमी काही कमी झालेली नाही. प्रसिद्ध कुस्तीपटू गीता फोगाट किंवा खलीच्या अकादमीत शिकणाऱ्या बुलबुलने आपल्या पराभवाचा सूड उगवावा, असं राखीने म्हटलं आहे. हरियाणात पंचकुलातील ताऊदेवी लाल स्टेडियममध्ये ग्रेट खलीने आयोजित केलेल्या रेसलिंग शोमध्ये परदेशी कुस्तीपटू रोबेलने आपटल्यामुळे राखीला दुखापत झाली होती.


सीडब्लूई चॅम्पियनशिपमध्ये रोबेलने रिंगमध्ये येताच पंचकुलातील महिलांना मुकाबल्यासाठी आव्हान दिलं होतं. रोबेलचं आव्हान स्वीकारत राखी सावंत रिंगमध्ये गेली. आधी माझं डान्सचं आव्हान पूर्ण कर, असं राखी रोबेलला म्हणाली. त्यानुसार, रोबेलने एका गाण्यावर राखीसोबत डान्स केला. गाणं संपताच रोबेलने राखीला खांद्यावर उचललं आणि काही काळ हवेत उचलून धरत खाली आपटलं. यामध्ये राखीला मोठी दुखापत झाली.

राखीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राखीला असह्य वेदना होत असल्यामुळे रुग्णालयातून व्हीलचेअरवरुन हॉटेलमध्ये आणण्यात आलं. बेडवर झोपूनच तिने मीडियाशी बातचित केली.

'त्या फिरंगीच्या डोक्यात कोणतं भूत शिरलं, कोणास ठाऊक. मी बॉलिवूडमधून आली आहे, हे तिला माहित नसावं. प्रेक्षकातील सगळे जण माझं नाव पुकारत होते. त्यामुळे तिला राग आला. तिने मला हवेत काही वेळ उलटं लटकवून ठेवलं. माझी शुद्धच हरपली. तिने मला जोरात खाली आपटलं. मी काय कुस्तीपटू आहे का. माझी पाठ, पोट आणि कमरेखालच्या भागाला दुखापत झाली आहे. खली भाई स्वतः भेटून गेले. त्यांचा काहीच दोष नाही. मला तर तिचीच भीती वाटते. ती वेडी आहे. पण मला तिचा सूड घ्यायचा आहे. तिने मला उचलून आपटलं आहे.' असं राखी तावातावाने म्हणाली.

खलीला माझी विनंती आहे, त्याच्या अकादमीत शिकणारी बुलबुल किंवा गीता फोगट यांना बोलवावं. माझ्या पराभवाचा वचपा त्यांनी काढावा, अशी मागणी राखीने केली आहे.

राम रहीम की तनुश्री दत्ताचा कट?

या प्रकारामागे कोणाचं षडयंत्र आहे माहित नाही. मी बाबा राम रहीमच्या परिसरात होते. हे त्याचं कारस्थान आहे की तनुश्री दत्ताचं माहित नाही. राखी आणि खली यांना पब्लिसिटी स्टंटची काय गरज आहे? उद्या राखी सावंत मेली तरी लोकांना वाटेल पब्लिसिटी स्टंट आहे, असंही राखी म्हणाली.