मुंबई : 'रंगीला राजा' या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिनेमाचे निर्माते आणि सीबीएफसीचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांना तातडीने दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. 'रंगीला राजा' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने 20 कट्स सुचवल्याविरोधात निहलानी यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. येत्या शुक्रवारी हा चित्रपट रीलिज होणार आहे.


न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे मंगळवारी या संदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली. मात्र हे प्रकरण द्विसदस्यीय खंडपीठाच्या अखत्यारित येत असल्याने हायकोर्टाने तूर्तास यावर सुनावणी घेण्यास नकार देत नियमित खंडपीठापुढे जाण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तोपर्यंत याचिकाकर्ता सीबीएफसीकडे यासंदर्भात पुनर्विचार अर्ज दाखल करु शकतात, असा सल्लाही हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळे येत्या 16 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

खरं तर आजवर काही निर्माता आणि दिग्दर्शकांनी निहलानी यांच्या कामकाजावर आक्षेप घेत हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र आता हीच वेळ सीबीएफसीच्या माजी अध्यक्षांवर आली आहे. आपला आगामी सिनेमा 'रंगीला राजा'साठी निहलानींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आपल्यावर असलेल्या आकसापोटी काही जण आपल्याविरोधात कट कारस्थान रचत असल्याचा आरोप निहलानी यांनी केला आहे. सेन्सॉर बोर्डाने 'रंगीला राजा' वर लावलेल्या 20 कट्सवर आक्षेप घेत निहलानींनी त्याला विरोध केला.

इतकंच नाही तर सीबीएफसीच्या कामकाजात काही केंद्रीय मंत्री सतत ढवळाढवळ करत असतात. आपल्या कार्यकाळात आपण त्यांचे फोन घेतले नाहीत. आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपलं काम केलं. ही गोष्ट अनेकांना रुचलेली नाही. त्यामुळे निव्वळ सूड उगवण्यासाठी हे षडयंत्र आपल्याविरोधात सुरु असल्याचा दावा निहलानी यांनी केला.

भारतीय बँकांना शेकडो कोटींचा चुना लावून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय माल्ल्याच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. निहलानींच्या 'इल्जाम' आणि 'आँखे' या सुपहिट चित्रपटांत काम करणारा बॉलिवूडचा हिरो नंबर 1 गोविंदा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.