Rakhi Sawant : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण आता अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ झाली आहे. 'ड्रामा क्वीन' राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. अभिनेत्रीला अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
खासजी आणि आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी विभक्त पती आदिल खान दुर्रानीने (Adil Khan Durrani) राखी सावंत विरोधात तक्रार दाखल केली होती. पण आता ड्रामा क्वीनला अटकेपासून दिलासा देण्यास दिंडोशी सत्र न्यायालयाने नकार दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. काही दिवसांपूर्वी तिने विभक्त पती आदिल खान दुर्रानीचा एक खासजी आणि आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. बदनामी करण्याच्या हेतूने राखीने व्हिडीओ शेअर केल्याचा दावा आदिलने केला होता. आदिल दुर्राणीने राखी सावंत विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आदिलच्या तक्रारीनुसार पोलिसांनी राखी सावंतवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अभिनेत्रीने अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी न्यायालयात धाव घेतली.
आपल्याला खोट्या प्रकरणात सामील केले जात असून त्रास देण्याच्या उद्देशाने गुन्हा दाखल केल्याचा दावा 'ड्रामा क्वीन'ने केला होता. पण राखीने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीकांत भोसले यांनी फेटाळला आहे. राखीने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ फक्त अश्लील नसून आक्षेपार्हदेखील आहे. त्यामुळे तिचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला नाही.
राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
राखीने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ आक्षेपार्ह आहे. त्यामुळे याप्रकरणातील तथ्ये, आरोप आणि परिस्थितींचा विचार करता राखीचा अटलपूर्व जामीन मंजून करणे योग्य होणार नाही, असं निरीक्षण न्यायालयाने तिला दिलासा नाकारताना नमूद केले आहे. त्यामुळे राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
कोण आहे आदिल खान दुर्रानी? (Who is Adil Khan Durrani)
आदिल खान दुर्रानी हा राखी सावंतचा दुसरा पती आहे. कर्नाटकात राहणारा आदिल हा उद्योगपती आहे. राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानीचे अनेक म्युझिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ड्रामाक्वीन आणि आदिल खान दुर्रानी दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दोघांमध्ये नक्की सत्य कोण बोलतय हे जाणून घेण्याची चाहत्यांना उस्तुकता आहे.
संबंधित बातम्या