Dhurandhar: आदित्य धरचा हिट चित्रपट ‘धुरंधर’मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी (Rakesh Bedi) यांनी चलाख राजकारण्याची म्हणजेच जमील जमाली यांची भूमिका साकारली आहे. तर अवघ्या 20 वर्षांच्या सारा अर्जुनने (Sara Arjun) त्यांच्या मुलीची म्हणजेच यलीना जमाली हे पात्र साकारलं आहे. दरम्यान, ‘धुरंधर’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमधील राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. या व्हिडीओमध्ये राकेश बेदी साराला भेटण्यासाठी पुढे येताना दिसतात. ते तिला मिठी मारतात आणि त्यानंतर तिच्या खांद्यावर किस करताना दिसतात. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर काही युजर्सनी राकेश बेदींना जोरदार ट्रोल केलं.
‘धुरंधर’मध्ये राकेश बेदी-सारा अर्जुन बाप-लेक
या ट्रोलिंगवर राकेश बेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “सारा माझ्यापेक्षा खूप लहान आहे आणि चित्रपटात ती माझ्या मुलीची भूमिका साकारतेय. शूटिंगदरम्यान जेव्हा जेव्हा आम्ही भेटलो, तेव्हा आम्ही अगदी बाप-लेकीसारखीच एकमेकांना मिठी मारली. आमचं नातं चांगलं आहे, आम्ही मित्र आहोत आणि ते स्क्रीनवरही दिसतं.” पुढे ते म्हणाले, “इव्हेंटच्या दिवशीही मी तिला त्याच आपुलकीने भेटलो, पण तो क्षण चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला. तो दिवस इतर दिवसांसारखाच होता. मात्र लोकांना एका वृद्ध व्यक्तीची एका मुलीप्रती असलेली आपुलकी दिसलीच नाही. पाहणाऱ्याच्या नजरेतच दोष असेल तर आम्ही काय करणार?” असं ते म्हणालेत.
‘वाईट हेतू असता तर…’- राकेश बेदी
राकेश बेदी यांनी सारा अर्जुनचे आई-वडील राज अर्जुन आणि सान्या अर्जुन यांचाही उल्लेख केला, जे ‘धुरंधर’च्या टीझर लॉन्चवेळी तिथे उपस्थित होते. ते म्हणाले, “मी वाईट हेतूने तिला किस का करेन? तेही सगळ्यांसमोर स्टेजवर? तिचे आई-वडील तिथेच होते. लोक वेडे झाले आहेत, असे आरोप करत आहेत. सोशल मीडियावर फक्त वाद निर्माण करायचा हा सगळा प्रकार आहे.” विशेष म्हणजे, सोशल मीडियावर जरी काही लोकांनी राकेश बेदी यांना ट्रोल केलं असलं, तरी त्यांच्या चाहत्यांनी त्यांची पाठराखण करत ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.