मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहितीही दिली.


जया बच्चन यांनी दिलेल्या कागदपत्रांनुसार, त्यांच्याकडे आणि पती अमिताभ बच्चन यांच्याकडे एकूण 10.01 अब्ज रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. बच्चन दाम्पत्याच्या संपत्तीशी संबंधितक कागदपत्रांमधून रंजक आकडे समोर आले आहेत. यानुसार, उमेदवारी अर्ज भरताना अमिताभ बच्चन यांच्याकडे 1 लाख 23 हजार 257 रुपयांची रोकड होती. तर जया बच्चन यांच्याकडे 2 लाख 33 हजार 973 रुपये रोख होते.

बिग बींकडे जया बच्चन यांच्यापेक्षा जास्त दागिने

अमिताभ बच्चन यांच्याकडे जया बच्चन यांच्यापेक्षा जास्त दागिने आहेत. बिग बी यांच्याकडे 36.31 कोटी रुपयांचे दागिने आहेत तर जया बच्चन 26.10 कोटी रुपयांच्या दागिन्यांची मालकीण आहेत. इतकंच नाही तर अमिताभ बच्चन तब्बल 9 लाख रुपयांचं पेन स्वत:कडे बाळगतात, असं कागदपत्रांमधून समोर आलं आहे.

बच्चन दाम्पत्यावर कोट्यवधी रुपयांचं कर्ज

बच्चन दाम्पत्यावर कर्जही असल्याचं निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून उघड झालं आहे. जया बच्चन यांच्या संपत्तीशी संबंधित दस्तऐवजांमध्ये अमिताभ यांच्यावर 18 कोटी 28 लाख 20 हजार 951 रुपयांचं कर्ज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तर जया बच्चन यांच्यावर अमिताभ यांच्यापेक्षा अनेक पटींनी जास्त कर्ज आहे. जया बच्चन यांच्यावर 87 कोटी, 34 लाख, 62 हजार 85 हजाराचं कर्ज आहे.

अमिताभ-जया यांची संपत्ती किती?

जया बच्चन यांनी दाखल केलेल्या पतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 1.30 अब्ज रुपयांची स्थावर संपत्ती आहे, तर बिग बींकडे 3.32 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. बच्चन दाम्पत्याच्या देशाच्या अनेक शहरांमध्ये जमिनी आहेत. लखनौ, नोएडा, बाराबंकी, भोपाळ, अहमदाबाद, गांधीनगर, पुणे आणि मुंबईतील जमिनीचा उल्लेख आहे.

जया बच्चन यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी जया बच्चन यांनी मुलायम सिंह यादव, पक्षाचे सर्व विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांचे आभार मानले. उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या दहा जागांसाठी 23 मार्च रोजी मतदान होणार आहे.