मुंबई : भारती सिंह आणि तिच्या पतीला अखेर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली. तिच्या घरी त्यांना गांजा सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. भारतीच्या अटकनेने इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. आता तिच्या अटकेनंतर मात्र एकेक लोक बोलू लागले आहेत. त्यात राजू श्रीवास्तवने उपरोधिक टोला लगावला आहे.


राजूने भारती सिंहच्या अटकेनंतर बोलताना तो म्हणाला, मी कुठल्याही पार्टीला बोलवत नाही. कारण मी कधीच ड्रिंक्स घेत नाही. त्यामुळे मला फार बोलावलं जात नाही. खरंतर विनोद निर्मिती करायला अमली पदार्थ घ्यावे लागतात का हा प्रश्नच आहे. राजू श्रीवास्तवने भारती सिंहचं नाव न घेता असा टोला लगावला आहे. अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी भारती आणि तिच्या नवऱ्याला अटक होणं हे चकित करणारं आहे असं तो म्हणतो.


कधीकाळी दोन वेळच्या भाकरीची भ्रांत असणारी भारती आता कोट्यवधींची मालकीन


भारती आणि हर्षचं नाव आल्यानंतर राजू श्रीवास्तव पहिल्यांदाच बोलला आहे. तो म्हणाला, 'भारती असं काही करेल असं मला वाटलं नव्हतं. सुरुवातीला त्या दोघांचं नाव आल्यानंतर मला वाटलं कुणीतरी दिशाभूल करण्यासाठी दोघांची नावं घेतली आहेत. पण आता दोघांनी हा कबुली जबाबही दिल्यानंतर गोष्टी समोर आल्या.' राजू श्रीवास्तवने भारतीसोबत बरंच काम केलं आहे. दोघांच्या लग्नालाही राजू होता. यावर राजू म्हणाला, 'या दोघांच्या लग्नात मी गेलो होतो. दोघेही नाचत होते. भरपूर कॉमेडी करत होते. मला खरंतर आश्चर्य वाटत होतं की हे लोक इतकी सतत कॉमेडी कशी करू शकतात. पण त्यानंतर माझ्या लक्षात सगळ्या गोष्टी आल्या. पण मला एक कळत नाही. कॉमेडी करण्यासाठी नशा करणं जरूरी आहे का?'


भारती आणि हर्ष लिंबाचिया या दोघांची वैद्यकीय तपासणी होते आहे. भारतीच्या घरातून आणि एका प्रॉडक्शन हाऊसच्या कार्यालयातून एनसीबीने गांजा जप्त केला. हा गांजा 86.5 ग्रॅम इतका असल्याचं कळतं.