Raju Srivastav Death : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav Death) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. 10 ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर कोसळले. यावेळी त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले. एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज (21 सप्टेंबर) त्यांचे निधन झाले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन राजू यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील ट्वीट शेअर करुन राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट शेअर करुन राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'राजू श्रीवास्तव यांनी आपले जीवन हास्य, विनोद आणि सकारात्मकतेने उजळवले. ते खूप लवकर आपल्यातून निघून गेले. पण अनेक वर्षांच्या त्यांच्या कमामुळे ते असंख्य लोकांच्या हृदयात जिवंत राहतील. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती.'
मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
'आपल्या रोजच्या जगण्यातील दमछाक करणाऱ्या प्रसंगांतूनही हास्य फुलवण्याची किमया राजू श्रीवास्तव यांनी साध्य केली. त्यांनी हास्यरंगाच्या अनेक छटा उलगडून दाखवल्या. विनोद निर्मितीतून ते भाषा आणि प्रांत यांच्या सीमा ओलांडून घराघरांत पोहचले. त्यांनी कलाक्षेत्रातही रचनात्मक असे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे आपण हरहुन्नरी आणि निखळ असा कलावंत गमावला आहे,' अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अमित शाह यांनी देखील ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये अमित शाह यांनी लिहिलं, 'हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांची एक खास शैली होती. त्यांनी आपल्या विनोदीशैलीनं अनेकांना प्रभावित केलं. राजू यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. '
कॉमेडियन कपिल शर्मानं देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं राजू श्रीवास्तव यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे.
'बिग बॉस 3', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळाली. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. ‘द किंग ऑफ कॉमेडी’ असंही राजू श्रीवास्तव यांना म्हणलं जातं. तसेच त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :