राजपाल यादवने पाच वर्षांपूर्वी 'अता पता लापता' हा सिनेमा बनवण्यासाठी दिल्लीतील उद्योजक एम.जी आग्रवाल यांच्याकडून पाच कोटींचं कर्ज घेतलं होतं. मात्र ते न चुकवल्याने, उद्योजक एम.जी आग्रवाल यांनी राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीविरोधात पाच कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप करुन न्यायालयात याचिका दाखल केली होती.
यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने या संदर्भात राजपाल यादवला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु 2013 साली राजपालने खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने उच्च न्यायालयाने त्याला दहा दिवसांची शिक्षा ठोठावली.
यानंतर राजपाल यादवने चार दिवसांचा तुरुंगवासही भोगला. त्याच्या वकिलांनी न्यायालयाकडे विनंती करुन त्याची सहा दिवसांची शिक्षा माफ करण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने राजपालला दिल्ली बाहेर न जाण्यास सांगितले होते.
त्यानंतरही राजपाल यादवला सहा दिवसांची शिक्षा भोगण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात राजपाल यादवने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र आता ही शिक्षा माफ करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.